सततच्या दुष्काळामुळे निर्माण झालेली नापिकीची परिस्थिती व त्यातून डोक्यावर वाढत जाणाऱ्या कर्जाच्या डोंगरामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या तरुण शेतकऱ्याने विषारी पदार्थ सेवन करत आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील गिलाणे येथे घडली.
राजेंद्र विठ्ठल अहिरे (३२) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. राजेंद्रच्या नावावर ६५ गुंठे क्षेत्र असून त्यात या वर्षी त्याने मका हे पीक लावले होते. मात्र परतीचा पाऊस न झाल्याने हे पीक करपून गेले. शिवाय गेल्या आठवडय़ात झालेल्या अवकाळी पावसामुळे जे होते, त्या पिकाचेही मोठे नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली. मागील दोन-तीन वर्षांमध्ये पुरेसे उत्पन्न मिळू शकले नसताना या वर्षीही त्याचीच पुनरावृत्ती झाल्याने डोक्यावरील कर्ज कसे फेडावे या विवंचनेत राजेंद्र होता. स्थानिक सहकारी संस्थेकडून शेतात घर बांधण्यासाठी तसेच पीककर्ज असे मिळून त्याने चार लाखांचे कर्ज घेतले होते. शिवाय काही रकमेची हातउसनवारीही केली होती. अलीकडे सहकारी संस्थेकडून कर्ज वसुलीचा तगादा सुरू झाल्यामुळे वैफल्य येऊन त्यातून त्याने १९ नोव्हेंवर रोजी विषारी पदार्थ सेवन केले होते. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर अत्यवस्थ स्थितीत त्यांनी त्याला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी त्याचे निधन झाले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल खात्याने गावी जाऊन पंचनामा केला आहे.