विधानसभा निवडणुकीची धामधूम आटोपल्यानंतर आता सर्वत्र शहरांमध्ये दिवाळी आनंदात साजरी करण्यासाठी घरोघरी तयारी सुरू असताना विदर्भातील शेकडो शेतकरी विधवा आणि शेतकऱ्यांच्या घरी मात्र आजही अंधार असल्यामुळे दिवाळी कशी साजरी करावी? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
यावेळी सुरुवातीच्या काळात गारपिटीने आणि त्यानंतर पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांकडे आज दोनवेळेचे जेवण कसे करावे अशी चिंता असताना त्यांच्याकडे जाण्यासाठी कोणालाही वेळ नसल्याचे दिसत आहे. विदर्भात गेल्या पाच वर्षांत नऊ हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने मोठय़ा प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेक शेतकरी कुटुंबे उपासमारीला तोंड देत आहेत. विदर्भात ३ लाखांवर कर्जबाजारी शेतकरी नैराश्यात गेल्यामुळे आत्महत्या करण्याच्या उंबरठय़ावर आहेत. अशा शेतकऱ्यांचा जीवन जगण्याचा अधिकार सुरक्षित करा, अशी मागणी विदर्भ आंदोलन समितीने केली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आहे. शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज घेतले आहे. मात्र, ते फेडण्यासाठी त्यांच्याजवळ पैसा नाही. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यातील अनेकांच्या घरी दयनीय अवस्था आहे.
शेतक ऱ्यांच्या मागण्यांसाठी सतत लढा देणारे विदर्भ जनआंदोलन समितीचे प्रमुख किशोर तिवारी म्हणाले, कापूस व सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा कमी भावाने सुरू असताना प्रशासनाला त्याची काहीच चिंता नाही. लोकसभा निवडणुका आटोपल्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल आणि त्यांच्यावर असलेले कर्ज माफ होईल अशी अपेक्षा असताना शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक घोषणा केल्या होत्या.  मात्र, त्या घोषणा आज हवेत विरल्या आहेत.
दिवाळीनिमित्त सगळीकडे आनंदाचे वातावरण असले तरी शेतकऱ्यांच्या घरी मात्र फटाके आणि फराळाचे पदार्थ  तर सोडा, पण एकवेळेचे जेवण करणे कठीण झाले आहे. निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. त्यामुळे केंद्रात भाजपचे सरकार आले. राज्यातही भाजपचे सरकार येणार आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावे, अशी मागणी तिवारी यांनी केली.
शेतकरी संघटनेचे नेते राम नेवले म्हणाले, दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकऱ्यांच्याजवळ आज पैसा नाही. त्यांच्या मालाला भाव नाही. शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी कर्जबाजारी असून त्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही त्यामुळे त्यांच्या घरी पूर्वी अंधार होता आणि आजही अंधार आहे.

यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे विदर्भात अत्यंत भयावह अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीला पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागला. जे काय थोडेसे पीक हाती येण्याची आशा होती, ती सुद्धा पावसाळ्याच्या शेवटी पावसाने पुन्हा दडी मारल्याने संपुष्टात आली. हे संकट उभे ठाकल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठय़ा प्रमाणात वाढतील, अशी भीती जनमंच या संघटनेने व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या जीवनात असा घनघोर अंधार पसरला असताना शहरी भागांमध्ये मात्र दिवाळीच्या उत्सवाची जोरात तयारी सुरू असल्याचा विरोधाभास दिसून येत आहे. भरीस भर म्हणून अगदी दिवाळीच्या तोंडाशी विजयी उमेदवारांच्या उत्साहाला उधान येणार आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीपूर्वी आणि दिवाळीत सुद्धा फटाक्यांचा आणि आतषबाजीचा नवीन उच्चांक प्रस्थापित होणार आहे. ज्या अन्नदात्याच्या कृपेने आपण जगतो त्याच्यावर अशी भीषण आपत्ती ओढवली असताना आपण अशाप्रकारे उत्सव साजरा करणे ही गोष्ट कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला वेदना देणारी आहे. तिकडे शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी आलेली असताना आपण धूमधडाक्यात सण साजरा करणे हा त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे मत जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी व्यक्त केले आहे.
अनवधानानेसुद्धा आपल्या हातून प्रमाद घडू नये, याची आपण सर्वानी काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी या संकटाच्या प्रसंगी आपल्या उत्साहाला आवर घालून फटाक्यांचा आणि आतषबाजीचा अतिरेक टाळावा आणि शेतकऱ्यांप्रती आपल्या सहवेदना प्रकट कराव्यात. विधानसभेच्या निवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवारांनी हे पथ्य विशेषत्वाने पाळावे, अशी विनंती जनमंचने केली आहे. प्रत्येक यशस्वी उमेदवारांच्या विजयामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या मतांचे मोठे योगदान राहील हे उघड आहे. त्यामुळे निवडून येताच लोकनेते या नात्याने शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदतीचा हात देता येईल, यावर त्यांनी गांभीर्याने लक्ष केंद्रित करावे. विजयाच्या उन्मादात आतषबाजी आणि फटाक्यांचा अतिरेक करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा अपमान करू नये, अशी विनंतीही अ‍ॅड. किलोर यांनी केली आहे.