नव्याने प्रस्तावित असलेल्या भूसंपादन कायद्यात केंद्र सरकारने उद्योजक व भांडवलदारांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या तरतुदी बदलून अध्यादेश काढला आहे. त्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून या विरोधात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली २४ फेब्रुवारी रोजी दिल्लीत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्याच दिवशी गांधी चौक, उरण येथेही आंदोलन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.
शासनाच्या विकासकामांसाठी शेतकऱ्यांच्या जमीन संपादन करण्याचा अधिकार सरकारला आहे. ब्रिटिशकालीन भूसंपादन कायद्यात केंद्र व राज्य सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलाने विकत घेतल्या आहेत.
देशातील शेतकऱ्यांच्या सेझविरोधी करण्यात आलेल्या तीव्र आंदोलनामुळे यूपीए सरकारला ब्रिटिशकालीन १८९४ चा भूसंपादन कायदाच बदलावा लागला. त्याचप्रमाणे कूळ कायद्यासाठी रायगड जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी १९३२ ते १९३७ असे पाच र्वष संप करून सरकारला शेतकऱ्यांचा हक्क मि़ळवून देण्यास भाग पाडले होते. त्यानंतर स्वातंत्रोत्तर काळातही शासनाने विविध विकास कामांसाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला व आपले हक्क संघर्षांतूनच मिळवून घेतले होते. असे असतानाही भाजपच्या एनडीए सरकारने केवळ भांडवलदारांच्या हितासाठी कायद्यात बदल करून त्यांच्यासाठी सोयीच्या तरतुदी देण्याचे संकेत दिले असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
नव्याने प्रस्तावित भूसंपादन कायद्यात शेतकऱ्यांना किमान न्याय देणाऱ्या हक्काच्या तरतुदींचा समावेश करण्यात आला होता. परंतु या तरतुदी उद्योजक व भांडवदारांना भूसंपादनात अडचण निर्माण करू लागल्याने केंद्र सरकारने या प्रस्तावातील शेतकऱ्यांच्या हिताच्या तरतुदी बदलून अध्यादेश काढला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप खदखदत असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही सरकारच्या या धोरणाचा तीव्र निषेध केला आहे. या अध्यादेशाविरोधात शेतकऱ्यांमध्ये असलेल्या संतापाकडे सरकारचे लक्ष वेधावे यासाठी अण्णा हजारे यांनी २४ फेब्रुवारी रोजी दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांच्या आंदोलनाला पािठबा देण्यासाठी उरणमध्येही शेतकरी आंदोलन करणार आहेत, अशी माहिती रायगड जिल्हा किसान सभेचे सरचिटणीस संजय ठाकूर आणि सीआयटीचे नेते भूषण पाटील यांनी दिली आहे. या आंदोलनात उरण तालुक्यातील सर्व सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.