सिडकोच्या नैना प्रकल्पासाठी आम्ही ५० टक्के जमीन दिली, तर त्याबदल्यात सिडको आम्हाला नवी मुंबई शहर प्रकल्पाप्रमाणे साडेबारा टक्के किंवा विमानतळ प्रकल्पातील शेतकऱ्यांना दिलेल्या साडेबावीस टक्के जमिनीचे भूखंड देणार आहे का, असा सवाल नैना प्रकल्पातील शेतकऱ्यांनी उपस्थित केल्याने सिडकोच्या अधिकाऱ्यांना कपाळावर हात मारून घेण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही. याशिवाय शेतकऱ्यांच्या गायचरण जमिनीचे काय करणार, हा उपस्थितीत केलेला प्रश्न सिडकोच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडवणारा ठरला आहे.
राज्य शासनाने रायगड जिल्ह्य़ातील २७० गावांशेजारील शेतकऱ्यांची ६० हजार हेक्टर जमीन विकास आराखडा तयार करण्यासाठी सिडकोला दिली आहे. ही जमीन सिडको संपादित करणार नाही. सिडको या जमिनीवर आरक्षण, सेवासुविधा यांचा आराखडा तयार करून देणार आहे. येथील शेतकऱ्यांनी साडेसात हेक्टर जमीन सिडकोला दिली, तर सिडको त्यांना दोन वाढीव एफएसआय व पायाभूत सुविधा देणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि सिडकोच्या संयुक्त विद्यमाने एक नवीन शहर निर्माण करण्याचा शासनाचा विचार आहे. मुंबईवर आदळणारे लोकसंख्येचे लोंढे कमी करण्याचा शासनाचा हा आणखी एक प्रयोग आहे. सिडको या शेतकऱ्यांची जमीन संपादित करणार नसल्याने त्यांना जमिनीचा मोबदला, नुकसान भरपाई, साडेबारा टक्के, साडेबावीस टक्के देण्याचा प्रश्न येत नाही. तरीही नवी मुंबई शहर व विमानतळ प्रकल्पातील शेतकऱ्यांना सिडकोने दिलेल्या या भूखंडामुळे जगण्याची नवीन उमेद प्राप्त झाल्याचे या शेतकऱ्यांनी जवळून पाहिले आहे. या भूखंडामुळेच या प्रकल्पग्रस्तांचे जीवनमान उंचाविल्याचा या शेतकऱ्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे एफएसआय वगैरे ठीक आहे, पण किती टक्के विकसित भूखंड देणार, त्याचे प्रथम बोला, असा सवाल चिपळे गावातील सभेत या शेतकऱ्यांनी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांना थेट विचारला. त्यामुळे साडेबारा टक्के योजनेप्रमाणे भूखंड मिळण्याचे भूत या शेतकऱ्यांच्या डोक्यातून जात नसल्याचे दिसून आले. या विकसित भूखंडाप्रमाणेच गावांच्या शेजारी असलेल्या हजारो एकर गायचरण जमिनीचे काय करणार, असा सवाल एका वयोवृद्ध शेतकऱ्याने विचारला. ही जमीन सरकारी असली, तरी ती गावातील जनावरांच्या चारापाण्यासाठी राखीव ठेववण्यात आली आहे. त्यामुळे विकास करताना सिडको ही जमीन संपादित करणार आहे, पण त्या बदल्यात ग्रामस्थांना काय दिले जाणार आहे, असा सवाल शेतकऱ्यांनी विचारल्यानंतर सिडकोच्या अधिकाऱ्यांनाही काय उत्तर द्यावे हे कळेनासे झाले. त्यामुळे नैना प्रकल्प शेतकऱ्यांच्या गळी उतरविण्यासाठी मैदानात उतरलेल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांना या मोहिमेत कितपत यश येईल, ते येणारा काळच ठरविणार आहे.