शेतकऱ्यांना हवामानविषयक ताजी माहिती देण्यासाठी शहरातील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात अत्याधुनिक असे स्वयंचलित हवामान स्थितीदर्शक उपकरण कार्यान्वित करण्यात आले आहे. या उपकरणाद्वारे मिळणारी माहिती शेतकऱ्यांना ‘एसएमएस’च्या माध्यमातून देणारा हा उपक्रम आहे.
या उपकरणाद्वारे प्राप्त होणारी हवामानविषयक माहिती अधिकाधिक लोकांना मिळावी आणि विशेषत: बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांना आपल्या शेतीविषयक कामांचे नियोजन करणे सुलभ व्हावे, या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी दिली. महाविद्यालयाच्या भूगोल विभागातर्फे कार्यान्वित करण्यात आलेल्या या स्वयंचलित उपकरणाद्वारे दररोजचे तापमान, हवेतील आद्र्रता, वायूभार, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, पर्जन्यमान आदींची नोंद होत असते.
हे उपकरण संगणकाशी जोडल्याने या सर्व नोंदींची अद्ययावत माहिती साठवली जाते. या उपकरणाची निर्मिती हा भूगोल विषयातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासांतर्गत करण्यात आली असली तरी दैनंदिन जीवनात सर्वाना ही माहिती उपयुक्त ठरू शकणार असल्याने त्या दृष्टीने शेतकऱ्यांना माहिती देण्याची कल्पना पुढे आली. दिवसभरात दोन वेळा ही माहिती देण्यात येणार असून, त्यासाठी महाविद्यालयातर्फे शेतकऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक मिळविण्यास सुरुवात झाली आहे. भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सी. एम. निकम तसेच त्यांचे सहकारी प्रा. राकेश पाटील आणि प्रा. बी. ए. आव्हाड यांच्या देखरेखीखाली हे काम केले जाणार आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला भ्रमणध्वनी  क्रमांक महाविद्यालयाकडे देण्याचे आवाहनही प्राचार्य डॉ. निकम यांनी केले आहे.