रासायानिक शेतीचे दुष्परिणाम लक्षात आल्याने सेंद्रीय व नैसर्गिक शेतीकडे राज्यातील शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. नवे सेंद्रीय शेती धोरण जाहीर करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या जानेवारीमध्ये केली होती. गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी नव्या धोरणाची प्रतीक्षा करीत आहेत.
 रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापराने अन्नधान्य आणि भाजीपाल्यांमध्ये विषारी घटकांचे प्रमाण आढळून आल्याने विषमुक्त धान्य, भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती, सेंद्रीय दूध आदी खाद्यपदार्थाच्या वापराकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. अशा स्वरूपाच्या कृषीमालाची मागणी वाढत असल्याने सेंद्रीय व नैसर्गिक शेती फायद्याची ठरत आहे. राज्यात सेंद्रीय शेती करणाऱ्यांची संख्या एक लाखावर पोहोचली आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊनच नैसर्गिक (सेंद्रीय) शेतमाल उत्पादक संस्थेने रामदासपेठेतील लेन्ड्रा पार्कमध्ये ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र’ सुरू केले आहे. विदर्भात सेंद्रीय शेतमाल उत्पादन करणारे जवळपास एक हजार शेतकरी आहेत, परंतु प्रमाणीकरण करून घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या फारच कमी आहे.
‘नॅशनल प्रोग्राम फॉर ऑरगॅनिक प्रॉडक्शन’अंतर्गत काम करीत असलेल्या नैसर्गिक (सेंद्रीय) शेतमाल उत्पादक संस्थेचे विदर्भात प्रामुख्याने नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, अकोला, अमरावती या जिल्ह्य़ांमध्ये २२२ शेतकरी सभासद आहेत. नागपूर जिल्ह्य़ात काटोल, नरखेड, सावनेर, हिंगणा व नागपूर तालुक्यातील शेतकरी हे उत्पादन घेत आहेत. सेंद्रीय शेती आणि देशी गाईंचे पालन करणाऱ्यांना अनुदान द्यावे, राज्य सरकारने सेंद्रीय शेती धोरण लवकर जाहीर करावे, अशी मागणी शेतक ऱ्यांनी केली आहे.
कृषी उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांच्या होणाऱ्या अतिवापरामुळे जमिनीच्या सुपिकतेत घट होत आहे. पिकांसाठी आवश्यक असलेल्या सेंद्रीय घटकांचे प्रमाण कमी होत असल्याने जमिनीचे आरोग्य धोक्यात येणे हा भविष्यकाळासाठी धोक्याचा इशारा ठरत आहे. जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यात महत्त्वाचे कार्य करणाऱ्या सेंद्रीय घटकांचे प्रमाण कमी झाले आहे.
शेतीसाठी सेंद्रीय कर्ब २ टक्के आवश्यक असताना त्यात घट होऊन तो आता ०.३ टक्के शिल्लक आहे, याकडेही शेतकऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे.

शासनाने लक्ष देण्याची गरज
नैसर्गिक शेती पर्यावरणपुरक, कमी खर्चाची, विषमुक्त, शोषणमुक्त व कल्याणकारी आहे. या पद्धतीत उत्पादन खर्चात घट होते. रसायनमुक्तीमुळे जमिनीचा पोत सुधारतो, सुपिकता टिकून राहते आणि हेक्टरी उत्पादन वाढते. मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करूनही १५ ते २० टक्के उत्पादन वाढवता येते. विषमुक्त, रसायनमुक्त व प्रमाणित आहार उपलब्ध करून देण्यासाठी नागपुरात रामदासपेठेत सेंद्रीय-नैसर्गिक शेतमाल विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. ग्राहकांना उच्च दर्जाचे धान्य माफक भावात मिळावे, या हेतूने सेंद्रीय धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. शेतक ऱ्यांची अतिखर्चिक रासायनिक शेतीपासून सुटका करून गावराणी गाईला केंद्रबिंदू मानून तिचे शेण व गोमूत्र यावर शेती कशी करावी, याचे प्रशिक्षण आमच्या संस्थेच्यावतीने शेतक ऱ्यांना दिले जाते. सेंद्रीय शेती उत्पादन वाढण्यासाठी शासनाने अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
साहेबराव धोटे, अध्यक्ष, सेंद्रीय-नैसर्गिक शेतमाल उत्पादक संस्था, नागपूर</p>