शेती मालाच्या उत्पादनावरील खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. हा उत्पादन खर्च कमी करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. समूह गट शेतीतून हा खर्च कमी करणे शक्य असल्याने याद्वारे शेती व्यवसायाला उर्जितावस्था येऊ शकते. असे प्रतिपादन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले. कृषि विभाग यांच्यावतीने संगमनेरमध्ये आत्मा योजनेतंर्गत शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार डॉ. सुधीर तांबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कृषि विद्यापिठाचे कुलगुरु तुकाराम मोरे होते. तर व्यासपिठावर अशोक भांगरे, रामभाऊ भुसाळ, सुनिता भांगरे, संजय देशमुख, बापुसाहेब गुळवे, जिल्हा कृषि अधिक्षक पंडीतराव लोणारे आदी उपस्थित होते.
विखे म्हणाले, की समूह गट शेतीच्या माध्यमातून स्वत:चा व गावचा विकास साधता येणे शक्य आहे. राज्यासमोर दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर अनेक आव्हाने आहेत. यावर्षीचा दुष्काळ हा पाण्याचा दुष्काळ आहे. शेती उत्पादनाच्या साधनांचा एकत्रित वापर करुन शेतीवरील खर्च मोठय़ा प्रमाणात कमी करता येऊ शकतो. कृषि विद्यापिठानेदेखील उत्पादन खर्च कमी कसा करता येईल यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम केले पाहिजे. शेततळ्यांसाठी ७५ टक्के अनुदानावर कागद उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
महसूलमंत्री थोरात म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून कृषि खाते नगर जिल्ह्याकडे असल्याने या खात्याने काम करण्याची एक चांगली परंपरा निर्माण केली आहे. चांगल्या कामासाठी नेतृत्व चांगले असावे लागते. विखे यांनी कृषि खात्याचे काम चांगल्या पध्दतीने केले. नेतृत्वाने दिशा दाखवायचीअसते. समूह शेतीचे चांगले मॉडेल जिल्ह्य़ात करा त्याचे अनुकरण राज्यात व देशातही झाले पाहिजे, असे थोरात यांनी सांगितले. आमदार डॉ. तांबे, आत्माचे संचालक आबासाहेब हराळ यांचीदेखील भाषणे झाली. संगमनेरचे कृषि खात्याचे उपविभागीय अधिकारी सुधाकर बोराळे यांनी प्रास्ताविक केले
 परस्परांची स्तुती
बऱ्याच दिवसानंतर थोरात विखे एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे ते काय भाष्य करतात याची उपस्थितांना उत्सुकता होती मात्र त्यांनी परस्परांचे कौतुकच केले. थोरात, आदीक यांच्या काळात कृषि खात्याचा पाया मजबूत झाल्याचे विखे म्हणाले. तर दहा वर्षांपासून जिल्ह्यात असलेले कृषि खाते चांगल्या पध्दतीने सांभाळण्याचे काम विखे यांनी केल्याचे सांगत थोरातांनीही त्यांचे कौतुक केले.