उरण तालुक्यातील खोपटे ते गोवठणे गावांच्या मध्ये असलेल्या शेकडो एकर जमिनीची समुद्राच्या उधाणापासून संरक्षण करणारे बांध कमकुवत झाले असून त्यांच्या दुरुस्तीचे काम रखडल्याने मंगळवारी आलेल्या भरतीच्या लाटांमुळे अनेक ठिकाणी बांध फुटल्याने या परिसरातील शेत जमिनीत समुद्राचे खारे पाणी शिरले आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणातून खारलँड विभागाने या परिसराच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आमची नसल्याचे सांगत हात झटकले आहेत.
उरणमधील समुद्र किनाऱ्यालगत येथील पूर्वजांनी अपार मेहनत करून चिखलातून भातशेतीची निर्मिती केली असून या भातशेतीचे समुद्राला येणाऱ्या महाकाय उधाणापासून संरक्षण करण्यासाठी मोठमोठे बांध तयार करून बंदिस्ती उभारलेली आहे. ही बंदिस्ती कमकुवत झाल्याने समुद्राच्या मोठय़ा भरतीच्या वेळी बंधारे फुटून समुद्राचे खारे पाणी भातशेतीत शिरते आणि त्यामुळे शेकडो हेक्टर जमिन नापीक होत आहे. अनेक संकटांवर मात करीत आज शेतकरी शेती करीत असताना शासनाच्या खारलँड विभागाकडून मंजूर झालेल्या कामाचा निधी वेळेत उपलब्ध होत नसल्याने खोपटा ते मोठीजुईदरम्यानच्या शेकडो हेक्टर जमिनीत समुद्राचे पाणी जाऊन जमिनी नापीक होण्याची भीती आहे. एकदा भातशेतीत पाणी शिरले की पुढील किमान तीन ते चार वर्षे शेतकऱ्याला या शेतीत पीक घेता येत नसल्याची माहिती खोपटे येथील शेतकरी श्याम ठाकूर यांनी दिली आहे. तसेच तीन वर्षे शेती पूर्ववत करण्यासाठी अपार मेहनत करावी लागते. आजच्या मजुरीच्या वाढलेल्या दरामुळे मजूरही मिळत नाहीत, तसेच मिळालेच तर ते परवडत नाहीत अशा अवस्थेत शेतकरी सापडला आहे.
या संदर्भात उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता खोपटा परिसरात आलेल्या समुद्राच्या भरतीमुळे शेतजमिनीत पाणी शिरल्याचे शेतकऱ्यांनी कळविल्याचे सांगून या संदर्भात आपण खारलँड विभागाशी संपर्क साधला असता हा भाग आमच्या कक्षेत येत नसल्याचे उत्तर त्यांनी दिले आहे. असे असले तरी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खारलँड विभागाशी या संदर्भात आपण पत्रव्यवहार करणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.