लहानथोर सगळ्यांनाच दिवाळीचे सगळ्यात मोठ्ठे आकर्षण असते. सुट्टीचे! फराळ, फटाके, नवीन कपडे, फिरायला जाणे या सगळ्या ‘मज्जा’ त्यानंतर येतात. परंतु समाजात असे अनेक अभागी असतात ज्यांना दिवाळीची सुट्टी मिळत नाही. तुमच्याआमच्या आनंदासाठी त्यांना स्वत:च्या आनंदावर पाणी सोडावे लागते. सीमेवर दक्ष असलेल्या जवानांची आठवण आपण ठेवतो. परंतु आपल्या शहरातही समाजाच्या आनंदासाठी कर्तव्यदक्ष राहणारी अनेक मंडळी असतात. अशाच काहींच्या दिवाळीची ही खबरबात!
उत्साहाचा झरा ‘वाहता’ राहावा म्हणून..
दिवाळीचा उत्साहाचा झरा ‘वाहता’ राहावा यासाठी सार्वजनिक वाहतूक विभागाचे कर्मचारी कामावर हजर असतात.  बेस्ट व एसटीचे ड्रायव्हर-कंडक्टर, उपनगरी रेल्वेचे मोटरमन-गार्ड आणि मेल-एक्स्प्रेसचे ड्रायव्हर-असिस्टंट ड्रायव्हर!  वीरेंद्रप्रसाद सिंग २५ वर्षे इंजिन ड्रायव्हर आहेत. सणासुदीला घरी जाणाऱ्यांच्या आनंदातच ते स्वत:चा सण साजरा करतात. ते म्हणतात, सीमेवरील सैनिकांची दिवाळीही अशीच साजरी होते ना. त्यांना तर सहासहा महिने घरी जाता येत नाही. आम्ही दिवाळीच नव्हे तर सर्व सण सहकाऱ्यांसोबत साजरा करतो. आमच्या ‘रनिंग रूम’मध्ये सगळ्या जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन असेल तो सण साजरा करतो. दिवाळी -दसऱ्याला आम्ही आमचे इंजिन सजवतो, त्याला हारतुरे चढवतो. नारळ फोडतो. कोकण रेल्वेवर दसरा दिवाळीच नव्हे तर गणपती, होळीसारखे सणही आम्हाला अधिक आनंद देतात. आमचे प्रवासी हेच आमचे कुटुंब आहे, असे आम्ही मानतो. उपनगरी सेवेवर १८ वर्षे गार्ड असलेले महेंद्रपाल यांना मात्र अनेकदा घरच्यांसोबत सण साजरा करायची संधी मिळाली आहे. तीही त्यांच्या सहकाऱ्यांमुळे! आम्ही सर्व सहकारी एकमेकांना सांभाळून घेतो. कधी मी इतरांना सुट्टी घेऊन घरच्यांसोबत सण साजरा करायची संधी देतो तर कधी ते मला. अनेकदा गणपती किंवा दिवाळीसारख्या तीन-चार दिवसांच्या सणामध्ये आम्ही आमच्या कामाच्या पाळ्या अशा पद्धतीने लावून घेतो की आम्हाला एक दोन दिवस घरच्यांसोबत राहायला मिळते. सणाच्या वेळी ज्या स्थानकावर असतो तेथील विश्रांतीच्या खोलीमध्ये आम्ही उत्साहात सण साजरा करतो, असे त्यांनी सांगितले. रेल्वेपेक्षा बेस्टच्या ड्रायव्हर-कंडक्टरना वेगळा अनुभव मिळतो. कारण त्यांचा प्रवाशांशी थेट संपर्क असतो. वांद्रे डेपोमधील कंडक्टर दुर्योधन सावंत यांनी तर एका वर्षी मध्यरात्री भाऊबीज साजरी केली होती. दिवाळीत भावाने घरी यावे, असे माझ्याही बहिणीला वाटत होते. पण नोकरीवर जावेच लागले. त्या दिवशी बहिणीकडे जायला मिळते की नाही, ही चिंताच होती. गर्दी प्रचंड होती. लहान मुलांना घेऊन अनेकजण प्रवास करत होते. त्यात रात्रीचे ११ कधी वाजून गेले कळलेच नाही. मग मात्र धावतपळत बहिणीचे घर गाठले तेव्हा ती माझ्यासाठी जागीच होती, अशी आपली हृद्य आठवण सावंत यांनी सांगितली.

दिवाळीही ‘बंदोबस्तात’च!
दिवाळीचे आणि पोलिसांचे सहसा वैरच असते! दिवाळीच्या आधी पंतप्रधानांसह अनेक व्हीआयपीं मुंबईत येऊन गेले. त्यामुळे सलग तीन दिवस बंदोबस्तात गेले. या बंदोबस्तामुळे दिवाळीसाठी खरेदी आणि इतर तयारी करता आली नाही. दिवाळीत सुट्टी मिळत नाही. रजा रद्द होतात. कुटुंबप्रमुख घरात नसल्याने महिलाच दिवाळीची सगळी कामे उरकतात. गोवंडीच्या पालिका वसाहतीमधली पोलिसांची इमारत डबघाईला आली आहे. पण त्यामुळे घरात रंगरंगोटीही करता येत नसल्याची खंत येथील पोलिसांनी व्यक्त केली. आमचे बाबा दिवाळीला कधीच घरी नसतात. मग आम्ही  मुलेमुलेच एकत्र येऊन दिवाळी साजरी करतो, असे गोवंडीच्या पोलीस वसाहतीत राहणाऱ्या महेश बागलने सांगितले महिला पोलिसांना तर या पारंपारिक सणात घरी नसल्याची खंत खूपच जाणवते. त्यामुळे बऱ्याचजणी तयार फराळाचा पर्याय स्वीकारतात. मात्र, या नोकरीचा पर्यायसुद्धा आम्हीच स्वीकारला असल्याने तक्रार तरी काय करायची असे एका महिला पोलिसाने सांगितले. अशीच गत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही असते. माझी मुले दिवाळीसाठी आई वडिलांकडे गावी गेली. पण मला जाता आले नाही. माझी पत्नी घरी एकटीच तयारी करते. मी अवघे काही तास घरी दिवाळीसाठी असतो, अशी खंत परिमंडळ ५ चे उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी बोलून दाखवली. तर यंदा लक्ष्मीपूजनाला घरी राहण्याचा योग जुळून येईल, असे वाटत नसल्याचे पोलीस अधीक्षक रश्मी करंदीकर यांनी सांगितले. पण कितीही व्यस्त असले तरी दिवाळीचे दोन तीन तरी पदार्थ मी घरी बनवते, असे त्यांनी आवर्जून सांगितले.  दिवाळीत सर्वानाच बोनस मिळतो. पण तो पोलिसांना मिळत नाही. त्यामुळे साठवलेल्या पैशांतून दिवाळी साजरी करावी लागते, अशी खंत अनेक पोलिसांनी बोलून दाखविली. आमच्या मैत्रिणी पारंपारिक वेषात नटून थटून कार्यालयांमध्ये जातात. पण आम्हाला मात्र गणवेशातच यावे लागते, असा हेवा एका महिला शिपायाने व्यक्त केला.
वेगळीच विवंचना..
दिवाळी साजरी होत असताना मुंबईतल्या शेकडो पोलिसांच्या डोक्यावर मात्र ऐन दिवाळीत घरे रिक्त करण्याची टांगती तलवार आहे. माहीम, आझाद मैदान, वर्सोवा, आरसीएफ कॉलनी आदी पोलीस वसाहतीतील शेकडो कुटुंबांना घरे सोडण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर या नोटिसा आल्याने यंदा दिवाळीचा आनंद पार झोकाळून गेला आहे.

water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?

रुग्णसेवा हीच दिवाळी!
दिवाळीसारखा सण घरच्यांसोबत साजरा करण्याची इच्छा प्रत्येकाला असते. पण ऐन दिवाळीतही एखादी सुट्टी वगळता कामावर हजेरी लावावीच लागते अशा व्यवसायांपैकी एक म्हणजे रूग्णसेवा. १३ नोव्हेंबरचा पाडव्याचा दिवस वगळता मुंबईतील साडेतीन हजार आरोग्य स्वयंसेविकांचे काम दिवाळीतही अव्याहतपणे सुरू राहणार आहे. डेंग्यू आणि मलेरियाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या स्वयंसेविकांना हजेरी ‘मस्ट’ आहे. दिवाळीतही आम्ही सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत कामावर असू, असे आरोग्य स्वयंसेविकेचे काम करणाऱ्या छाया आव्हाड यांनी सांगितले.‘पाण्यात होणारी डासांच्या अंडय़ांची पैदास रोखण्यासाठी झोपडपट्टय़ा, चाळी या ठिकाणी पाणी भरून ठेवलेल्या पिंपामध्ये ‘अबेट’ नावाचे औषध टाकण्याचे काम आम्हाला सध्या करावे लागत आहे. या शिवाय घराघरांतील रुग्णांची माहिती घेणे, माता आणि बालसंगोपन, कुटुंबनियोजन आदी माहिती कुटुंबांमध्ये जाऊन देणे आदी कामेही आम्हाला करावी लागतात. दिवाळीत लोकांच्या घरी जाऊन हे काम करणे बरेचदा जीवावर येते. पण, यात कसूर करून चालत नाही. प्रत्येक दिवशी १२५ ते १५० कुटुंबांमध्ये भेट देण्याचे काम आम्हाला दिवाळीतही करावे लागणार आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली. कामावरून आल्यानंतर मग काय ती दिवाळी असे त्यांनी सांगितले. नानावटी रुग्णालयात वॉर्ड इन्चार्ज सिस्टर असलेल्या स्नेहल जाधव यांनाही आपली दिवाळी बहुतेककरून रुग्णांसमवेतच साजरी करावी लागते. दिवाळीत रुग्णांची संख्या त्या तुलनेत कमी असते. हा सण आपल्या घरी साजरा करता यावा यासाठी रुग्ण दिवाळीच्या आधीच सहसा ‘डिस्चार्ज’ घेतात. केवळ अपघात किंवा गंभीररित्या आजारी असलेले रुग्णच वॉर्डात असतात. पण, वॉर्डमध्ये सजावट करून, रुग्णांबरोबर आणि सहकाऱ्यांसमवेत गोडधोड आणि फराळ करून आम्ही आमच्या पद्धतीने दिवाळी साजरी करतो, असे त्यांनी सांगितले.
 
आनंदाला नसे मोल!
कितीही महागाई असो, विपरित स्थिती असो, रोजंदारीवर खपणारा कष्टकरी वर्ग नेहमीच प्रत्येक सण मोठय़ा जोशात साजरा करत आहे. मुंबईतील नाक्यांवर कामासाठी उभे राहणाऱ्या नाका कामगारांच्या दिवाळी कशी असणार याचा आढावा घेताना कामगारातून एकच सुर निघत होता. साहेब! आनंदाचे काय मोल नाही. सकाळी आपापल्या नाक्यावर जाऊन कामासाठी उभे राहणाऱ्या या कामगारांना आज हाताला काम मिळणार की नाही याची कधीच खात्री नसते. राज्यभरात अशा कामगारांची संख्या सुमारे १५ लाखांपेक्षा जास्त आहे. तर ज्यांच्या रोजच्या उत्पन्नाची निश्चिती नाही असे असंघटित कामगार कोटींच्या घरात आहेत. असे जरी असले तरी हा वर्ग सण साजरे करण्यामध्ये मागे नसतो. आपापल्या पध्दतीने हा सण साजरा करत असताना आर्थिक कुवतीनुसार गोड-धोड बनविले जातेच. कमी किमतीचे का असेनात पण नवीन कपडय़ांची खरेदी ते करतातच, असे कुल्र्यातील भारत नाक्यावरचा विलास सकट सांगतो. त्याचे तर म्हणणे आहे, दिवाळी ही खरी गरीबांचीच! कारण रोज गोड खाणाऱ्यांना दिवाळीच्या फराळाचे काय मोल राहणार. त्यामुळे उद्याची चिंता नसणारा कष्टकरी कामगारच सण अतिशय उत्सहात साजरा करत असतो. पण यावर्षी असंघटित क्षेत्रातील काही कामगार संघटनांनी दिवाळी अंत्यत वेगळ्या पध्दतीने साजरी करायचे ठरवले आहे. ‘मी एक कामगार, माझी नोंद कोण घेणार’ या मोहिमेंतर्गत कामगार आयुक्तांकडे नोंदणी करून सर्व प्रकारचे शासकीय लाभ मिळवण्यासाठी पात्र व्हा अशा प्रकारची जनजागृती मोहीम दिवाळीत राबवणार असल्याची माहिती महाराष्ट्र असंघटित सुरक्षा परिषदेचे सागर तायडे यांनी दिली. शासनाकडे जमा असलेल्या ८३२ कोटी रुपये निधीचा फायदा कामगारांच्या कल्याणासाठी करून घेता येईल, असे ते म्हणाले. असह्य महागाई, बेरोजगारी अशा अनेक समस्यांच्या गर्तेतून जात असताना हातावर पोट घेऊन जगणारी ही माणसे सण-उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे करतात. त्यामुळे ‘आनंदाला काही मोल नसते’ याची प्रचिती येते.