पालकमंत्री या नात्याने नर्मदा सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या भावना आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत पोहचविणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री अ‍ॅड. पद्माकर वळवी यांनी येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात अ‍ॅड. वळवी यांनी पुनर्वसन वसाहतीतील जनतेच्या भावना जाणून घेतल्या.
यावेळी जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरीया, अपर जिल्हाधिकारी गुलाब खरात, सरदार सरोवर प्रकल्पाचे अपर जिल्हाधिकारी अशोक वायचळ व सरदार सरोवर प्रकल्प पुनर्वसनाशी संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. सरदार सरोवर प्रकल्प उभा राहिला. पिढय़ान्पिढय़ा जल, जमीन आणि जंगलाचे संरक्षण करणाऱ्या आदिवासींच्या त्यागाचा इतिहास विसरता येणार नाही. आपली घरे आणि जमिनी विकासासाठी त्याग करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनाही विकासाचा अधिकार आहे ही जाणीव ठेवूनच प्रत्येकाने प्रकल्पग्रस्तांसाठी निर्माण करण्यात आलेल्या वसाहतींमध्ये काम करायला हवे, असे वळवी यांनी सांगितले. पुनर्वसन झालेल्या वसाहतींमध्ये पाण्याचा प्रश्न भीषण असून येणाऱ्या काळात निर्माण होणाऱ्या टंचाईच्या परिस्थितीत हा प्रस्न गंभीर रुप धारण करणार आहे. हे लक्षात घेऊन पाणी, विद्युत पुरवठा, रोजगारांतर्गत रस्ते आणि जिल्ह्य़ातील प्रमुख तालुक्यांच्या प्रवाहात येण्याइतपत दळणवळण सुविधा पुरविण्यावर सर्वोच्च प्राधान्य देण्याच्याही सूचना त्यांनी केल्या.