मुंबईचा सर्वात जुना सांस्कृतिक व कला महोत्सव अशी ओळख असलेल्या काळा घोडा महोत्सवाला स्थानिक रहिवाशांकडून विरोध होत असताना उपनगरातील विलेपार्ले, वांद्रे, पवई, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई आदी ठिकाणी मात्र महोत्सवांची धूम असणार आहे. धकाधकीच्या आयुष्याला कंटाळलेल्या उपनगरवासीयांसाठी हे महोत्सव विरंगुळा-नवी ऊर्जा देणारे ठरत आहेत. या महोत्सवांमुळे त्या त्या परिसराचे सांस्कृतिक महत्त्व वाढत आहेच, शिवाय भविष्यात ‘आर्थिक महत्त्व’ वाढण्यातही ते उपयुक्त असल्याचे हेरूनच त्या त्या भागातील बिल्डरमंडळी या महोत्सवांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी पुढे सरसावत आहेत.
गेल्या वर्षी ठाण्यात ‘उपवन’ महोत्सव पार पडला. ‘काला घोडा’पेक्षाही सरस अशी वाहवा या महोत्सवाने मिळवली. ठाण्यातीलच नव्हे तर मुलुंड, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, नवी मुंबईपासून लोक सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी, कला प्रदर्शन पाहण्यासाठी, खरेदीसाठी आले. तब्बल चार ते पाच लाख लोकांनी या महोत्सवाला हजेरी लावली. या महोत्सवासाठी राजकीय पाठबळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे होते तर आर्थिक पाठबळ स्थानिक बिल्डरांचे होते हे विशेष. घोडबंदर, उपवन या परिसराचा भाव वधारण्यासाठी या महोत्सवाचा उपयोग होईल हे त्यामागचे समीकरण होते.
आता इतर ठिकाणीही अशा महोत्सवांचा धडाका लागला आहे. नुकताच डोंबिवलीत असा महोत्सव पार पडला. नामवंत शास्त्रीय कलावंतांनी त्यात आपली कला सादर केली. पार्ले महोत्सव भारतीय जनता पक्षाचे नेते पराग अळवणी यांच्या पुढाकाराने साजरा केला जातो. या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी (२१ डिसेंबर) या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. येथील दुभाषी मैदानावर होणाऱ्या महोत्सवात क्रीडा स्पर्धाचाही समावेश असतो. यंदाही ४१ क्रीडा प्रकार या मैदानावर सादर केले जाणार आहेत. या शिवाय लघुपट स्पर्धा, मॅरेथॉन, नृत्य व संगीत कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी असणार आहे.तर आता पवईत ९ ते १८ जानेवारी दरम्यान ‘पवई फेस्ट’ रंगणार आहे. आयोजक ‘रोटरी क्लब’ ही संस्था असली तरी या महोत्सवाला ‘हिरानंदानी ग्रुप’ या बांधकाम कंपनीचे पाठबळ लाभले आहे. हिरानंदानी गार्डनमध्ये साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवात सामाजिक, क्रीडा उपक्रम, संगीत स्पर्धा, प्रश्नमंजुषा, खाद्य स्पर्धा, फॅशन शो, डॉग शो, सेलिब्रिटी नाईट असे लहानांपासून मोठय़ांपर्यंत साऱ्यांसाठी बरेच काही असणार आहे.