काही सरकारी आस्थापनांमध्ये नवीन नियुक्ती होत नसल्याने कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार वाढत असून त्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली जात असल्याचे चित्र सर्वदूर असताना नागपूर दूरदर्शन मात्र तासभर प्रसारणासाठी ढीगभर कर्मचाऱ्यांना राबवत आहे.
नागपूर दूरदर्शनला दिवसभरात अर्धा तास कृषीवर आधारित कार्यक्रम आणि अर्धा तास अन्य कार्यक्रमासाठी वेळ देण्यात आला आहे. यामुळे या केंद्राचे आठवडय़ात सोमवार ते शनिवार केवळ सहा तासांचे प्रसारण होते. या केंद्राचे कार्यक्रम रविवारी प्रसारित होत नाहीत. सायंकाळी ६ ते ६.३० कृषीवर आधारित कार्यक्रम आणि ६.३० ते ७ वाजेपर्यंत विविध विषयांवरील कार्यक्रमांचे प्रसारण केले जाते. कार्यक्रमाची निर्मिती आणि त्याचे प्रसारण असे दोन प्रमुख कामे आहेत. त्या अनुषंगाने नियुक्त्या देखील झाल्या आहेत. परंतु दिवसाला केवळ एक तासाचे प्रसारण असल्याने येथील कर्मचाऱ्यांना विविध विषयांवर गप्पा मारण्यात भरपूर सवड आणि संधी उपलब्ध होत असल्याचे दिसून येते.
या केंद्रावर ११ सहाय्यक अभियंते, सहा वरिष्ठ अभियंता सहाय्यक आणि २२ तांत्रिक कर्मचारी मिळून ३९ अभियांत्रिकी कर्मचारी आहेत.
लेखा आणि प्रशासकीय विभागात २९ कर्मचारी आहेत. कार्यक्रम निर्मितीसाठी सहा कार्यक्रम निर्माते, तीन कॅमेरामन आणि दोन संपादक येथे नियुक्त आहेत. तसेच दूरदर्शन इमारतीच्या देखभालीसाठी सीसीडब्ल्यूचे कर्मचारी आणि या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र सिक्युरिटी सव्‍‌र्हिसकडे (मॅक्स) सोपविण्यात आली आहेत. अशाप्रकारे दिवसाला तासभराचे प्रसारण असलेल्या केंद्रावर ९० ते १०० कर्मचारी नियुक्त आहेत.

प्रेक्षक झोपल्यावर कार्यक्रम प्रसारित
राज्यात विदर्भाला सापत्न वागणूक मिळत असल्याची ओरड होत असताना दूरदर्शन संदर्भातील असाच एक प्रकार समोर आला आहे. राज्याची उपराजधानीतील नागपूर दूरदर्शनचे कार्यक्रम मुंबईहून आठवडय़ातून एक दिवस गुरुवारी दाखविले जातात, ते देखील मध्यरात्री १२ वाजता प्रसारित केले जातात. बहुतांश नागरिक झोपी गेल्यावर हे कार्यक्रम दाखवून दूरदर्शनला नेमके काय साध्य करायचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तास वाढविले तर..
मुख्यालयाने वेळ ठरवून दिल्याप्रमाणे येथून कार्यक्रम दिले जातात. आपल्याकडे सहा कार्यक्रम निर्माते आहेत. मुख्यालयाने प्रसारणाचे तास वाढविले तरी एवढय़ा लोकांमध्ये कार्यक्रम प्रस्तुत केले जाऊ शकतात. कर्मचारी कमी किंवा अधिक हा प्रश्नच उद्भवत नाही.
भूपेंद्र तुरकर,
उपसंचालक (प्रभारी), नागपूर दूरदर्शन