मध्य रेल्वेच्या स्थानकांवर महिलांसाठी प्रसाधनगृह कुठे आहे? याची चौकशी केल्याशिवाय त्याचा पत्ता सापडणे अशक्य. कोणत्याही स्थानकांवरील तीन-चार फलाट मिळून फक्त एकावरच दूर कोपऱ्यात एखादे प्रसाधनगृह आढळते. मग ते गाठण्यासाठी फलाट दर फलाट पार करत पोहोचलो तरी आत जाऊ की नको या विचाराने महिलांचा जीव मेटाकुटीला येतो. रेल्वेस्थानकांवरची प्रसाधनगृहे म्हटली की ती अंधारी, अपुरी स्वच्छता आणि पाण्याची सोय नाही अशा सगळ्या गोष्टी गृहित धरूनच तिथे पाय ठेवावा लागतो. मध्य रेल्वे स्थानक परिसरात सीएसटीचे मुख्य स्थानकावरील प्रसाधनगृह सोडले तर बाकीच्या ठिकाणी प्रसाधनगृहांच्या अवस्थेचे वर्णन हे अस्वच्छता आणि अव्यवस्था असेच करावे लागेल.
सीएसटी स्थानकावरच्या प्रसाधनगृहाची नियमितपणे देखभाल केली जाते. तेथे प्रसाधनगृहाचा वापर करण्यासाठी एक किंवा दोन रुपये द्यावे लागतात. मात्र निदान त्याचा वापर चांगलेपणाने करता येईल अशी स्थिती असल्यामुळे प्रवासीसुद्धा पैसे देण्यास का-कू करीत नाहीत. इतर स्थानकांमध्ये दादर या महत्त्वाच्या आणि अतिशय वर्दळीच्या स्थानकावरही प्रसाधनगृहाची देखभाल नियमितपणे केली जात नाही. त्यामुळे रेल्वेस्थानकांवरचे भिकारी आणि रात्रीच्या वेळी मुक्कामाला असणारे अन्य लोक यांच्यासाठी ही प्रसाधनगृहे मोठी सोय ठरली आहे. मुळातच प्रसाधनगृहांमध्ये कधीतरी स्वच्छता केली जाते. अन्य वेळेला वाट्टेल तसा वापर झाल्यामुळे दरुगधी आणि घाणीचे साम्राज्य असते. त्यातही चुकून एखादे प्रसाधनगृह स्वच्छ सापडलेच तर तिथे पाण्याची पुरेशी सोय नसते. काही ठिकाणी मोठमोठे पिंप भरून पाण्याची व्यवस्था केलेली आढळून येते. प्रसाधनगृहातील नळांची आणि दरवाजांची अवस्थाही वाईट आहे. कित्येक ठिकाणच्या प्रसाधनगृहांमधील खिडक्या खुल्या आहेत. या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच महिलांना या प्रसाधनगृहांचा वापर करावा लागतो. त्यामुळे ही प्रसाधनगृहे सोयीपेक्षा नाईलाजास्तव अखेरचा पर्याय म्हणून नाक बंद करून त्याचा वापर करावा आणि सुटलो बुवा एकदाचे म्हणत तिथून बाहेर पडावे. प्रवासात प्रसाधनगृहांचा वापर करण्यापेक्षा थोडा वेळ कळ काढण्याकडेच महिलांचा कल आहे.