ठाणेकरांनी यंदाच्या दिवाळीत मोठय़ा आवाजांच्या फटाक्यांऐवजी शोभेच्या फटाक्यांचा वापर मोठय़ा प्रमाणात केल्याने ध्वनिप्रदूषण कमी झाले. मात्र वायुप्रदूषणात वाढ झाल्याचे समोर आले असतानाच फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहरातील आगीला निमंत्रण दिल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या आठ दिवसांत म्हणजेच दिवाळी सणाच्या काळात शहरातील २४ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या असून त्यामध्ये फटाक्यांमुळे आग लागल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. असे असले तरी, सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.
दिवाळीनिमित्त मोठय़ा प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. त्यात मोठय़ा आवाजाचे फटाके, भुईचक्र, पाऊस, हवेत उडणारे फटाके इत्यादी फटाक्यांचा समावेश असतो. विशेष म्हणजे, हवेत उडणारे शोभेचे फटाके नेमके कोणत्या दिशेने जातील, याचा काही नेम नसतो. त्यामुळे अनेकदा हे फटाके इमारतींमधील घरांमध्ये शिरल्याने आग लागते. त्यामुळे दिवाळी सणाच्या काळात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असते.
याच पाश्र्वभूमीवर ठाणे अग्निशमन दलाने यंदा शहरातील वेगवेगळ्या भागांत तात्पुरती अग्निशमन केंद्रे उभारली होती. नागरिकांना तात्काळ मदत मिळावी, या हेतूने उभारण्यात आलेल्या केंद्रांवर आग विझविण्याची सर्व साधने पुरविण्यात आली होती. त्यामुळे या केंद्रांमार्फत शहरात विविध ठिकाणी लागलेली आग लगेचच विझविण्यात यश आले, असे महापालिका सूत्रांनी सांगितले.  दिवाळी सणाच्या काळात म्हणजेच २१ ते २८ ऑक्टोबर या आठ दिवसांत शहरातील २४ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या असून त्यामध्ये इमारतीमधील घरे, दुकाने, रस्त्यावरील कचरा, वाहने, ट्रान्सफॉर्मर, मीटर बॉक्स, झाडे इत्यादींना आग लागली होती. ही आग फटाके, शॉर्ट सर्किट तसेच अन्य कारणांमुळे लागल्याची नोंद करण्यात आली आहे.
वसंत विहार येथील क्लब हाऊसचे प्लॅस्टिक तसेच हिरानंदानीमधील एका इमारतीच्या १५ व्या मजल्यावर फटाक्यांमुळे आग लागली होती. तसेच एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आणि एका रिकाम्या टेम्पोला फटाक्यांमुळेच आग लागल्याचे समोर आले आहे. याशिवाय, फटाक्यांच्या आतषबाजीमुळे रस्त्यावरील कचरा आणि झाडांना आग लागल्याचे समोर आले आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.