ठाणे शहराच्या पश्चिमेकडील डोंगररांगांमध्ये उभ्या राहिलेल्या बेकायदा वस्त्यांमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास मदतकार्य पोहोचवायचे तरी कसे असा सवाल ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पडला आहे. मुसळधार पावसात शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये मदतकार्य उभी करणारी यंत्रणा आपत्कालीन विभागामार्फत तयार केली जाते. मात्र, वागळेच्या डोंगरांमध्ये उभ्या राहिलेल्या बेकायदा चाळी तसेच झोपडय़ांवर एखादी कडा कोसळलीच, तर दाटीवाटीच्या या परिसरात मदतकार्याचे नियोजन कसे करायचे, याचा अभ्यास अग्निशमन यंत्रणा तसेच आपत्कालीन विभागाने सुरू केला आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या वागळे परिसरातील मामा-भांजे डोंगराच्या टेकडी तसेच तिच्या पायथ्याशी गेल्या काही वर्षांत बेकायदा चाळीची बांधकामे उभी राहिली आहेत. या चाळींच्या बांधकामांना आता रामनगर, जुना गाव, कैलासनगर, श्रीनगर, वारलीपाडा, हनुमाननगर, रूपादेवी टेकडी आणि लोकमान्यनगर असे म्हटले जाते. वनविभागाच्या माहितीनुसार, या परिसरात सुमारे तीन हजार बेकायदा बांधकामे आहेत. मात्र, या परिसराचा विस्तार पाहता त्याहून कितीतरी अधिक बांधकामे या ठिकाणी असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अतिशय दाटीवाटीने उभ्या करण्यात आलेल्या या वस्त्यांच्या तोंडापर्यत महापालिकेने रस्ते पोहोचविले आहेत. तरीही या वस्त्यांमध्ये जाण्यासाठी पायवाटांशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे येथे एखादी दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी मदतकार्य पोहोचविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाला अडचणींचा सामना करावा लागतो. आपत्ती यंत्रणा वस्त्यांपर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पायपीट करूनच मदतकार्य करावे लागते. यापूर्वीच्या तुरळक घटनांमधून ही बाब उघडकीस आली आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात दरवर्षी अतिवृष्टीसारखे प्रसंग निर्माण होतात, त्या वेळी या वस्त्यांमधील नागरिक जीव मुठीत घेऊन राहत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. सावरकरनगर परिसरात डोंगराच्या पायथ्याशी म्हाडाच्या वसाहती असून त्यातील विश्वकर्मा सोसायटीच्या जवळच असलेली वनविभागाची संरक्षक भिंत बुधवारी कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे सोसायटीच्या आवारात चिखल साचला होता. या घटनेमुळे डोंगराच्या टेकडी आणि पायथ्यावर वसलेल्या वस्त्यांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे.