दिवाळीत फटाके तसेच अन्य कारणांमुळे लागणारी आग विझविण्यासाठी तात्काळ मदत मिळावी, यासाठी ठाणे अग्निशमन दलाने यंदा शहरातील वेगवेगळ्या भागांत तात्पुरती अग्निशमन केंद्रे उभारली आहेत. या भागांमध्ये तात्पुरते अग्निशमन केंद्रे उभारण्यात आली असून तेथे अग्निशमन वाहने, साधने पुरविण्यात आली आहेत. याशिवाय कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत दिवाळीच्या काळात शहरामध्ये घडलेल्या आगीच्या दुर्घटना लक्षात घेता ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.
दिवाळीनिमित्ताने मोठय़ा प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. त्यात मोठय़ा आवाजाचे फटाके, हवेत उडणारे फटाके, भुईचक्र, पाऊस आदी फटाक्यांचा समावेश असतो. मात्र या फटाक्यांची ठिणगी उडून आग लागण्याची दाट शक्यता असते. याशिवाय पणती, विद्युत रोषणाई तसेच अन्य कारणांमुळे आग लागण्याचे प्रकार घडतात. मागील काही घटनांचा आढावा घेतल्यास दिवाळीत फटाक्यांमुळे आग लागण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते. गेल्या दिवाळीत पाच दिवसांच्या कालावधीत आग लागल्याच्या सुमारे २५ घटना घडल्या होत्या. या घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र मालमत्तांचे मोठे नुकसान झाले होते. गेल्या काही वर्षांपासून वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली असून त्या तुलनेत रस्त्यांच्या रुंदीकरणास शहरात फारसा वाव राहिलेला नाही.
त्यामुळे शहराला वाहतूक कोंडीचा विळखा बसल्याचे दिसून येते. या वाहतूक कोंडीचा फटका अग्निशमन दलाला बसू लागल्याचे गेल्या काही घटनांमधून समोर आले आहे.
अग्निशमन वाहनाला वाहतूक कोंडीत मार्ग काढत आग लागलेल्या ठिकाणी पोहचावे लागते. त्यामुळे आग विझविण्यासाठी तात्काळ मदत पोहचविणे अग्निशमन दलाला शक्य होत नाही. या पाश्र्वभूमीवर अग्निशमन दलाने शहरात ठिकठिकाणी तात्पुरते अग्निशमन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार शहरातील दिवा, कळवा, शिवाजीनगर, गावदेवी, उपवन, ओवळा, कोपरी आणि पाचपाखाडी अशा आठ ठिकाणी अग्निशमन केंद्रे उभारण्यात आली आहेत. या केंद्रांवर अग्निशमन वाहन, आग विझविण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधनसामुग्री पुरविण्यात आली आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ा रद्द
दिवाळीत आग लागण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या असून त्यांची नेमणूक शहरातील आठ भागांमध्ये उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या अग्निशमन केंद्रांवर करण्यात आली आहे.
आग लागल्याची माहिती नियंत्रण कक्षात येताच तात्पुरत्या अग्निशमन केंद्रावरील कर्मचारी घटनास्थळी पोहचतील. त्यामुळे नागरिकांना तात्काळ मदत मिळू शकते, अशी माहिती ठाण्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी अरविंद मांडके यांनी दिली.