अपुरे मनुष्यबळ आणि कामाचा वाढता व्याप या कारणांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांवर कामाचा प्रचंड ताण पडू लागला आहे. अशा वेळी अतिरिक्त कामाचा पुरेसा मोबदलाही पदरात पडत नसल्यामुळे जवानांमध्ये चांगलीच नाराजी आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास कामाची वेळ संपल्यावर अतिरिक्त काम करण्यासाठी थांबायचे की नाही, असा विचार जवान करू लागले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळच मिळालेला नाही.
कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्याला तीन महिन्यांत ५० तासांपर्यंतच अतिरिक्त कामाचा (ओव्हरटाइम) मोबदला द्यावा. त्यापेक्षा अधिक तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मोबदला देण्यासाठी विभागप्रमुखांनी आयुक्तांची परवानगी घ्यावी, अशा आशयाचे परिपत्रक पालिका आयुक्तांनी काही वर्षांपूर्वी जारी केले आहे. या परिपत्रकामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त झाला होता. मात्र तरीही त्यात कोणताही बदल झाला नाही. आजही या परिपत्रकानुसारच अतिरिक्त कामाचा मोबदला दिला जात आहे. अत्यावश्यक सेवेत मोडल्या जाणाऱ्या अग्निशमन दलासाठी हे र्निबध सुरुवातीला शिथील करण्यात आले होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून याच परिपत्रकानुसार ओव्हरटाइम दिला जात आहे.
अग्निशमन दलामध्ये सध्या अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे जवानांवर कामाचा प्रचंड ताण आहे. अनेक वेळा कामाची वेळ संपल्यानंतर दुसरा कर्मचारी येईपर्यंत वाट पाहावी लागते. संबंधित केंद्रामध्ये जवान उपलब्ध नसल्यास दुसऱ्या केंद्रातून कर्मचाऱ्याला बोलवावे लागते. तो येईपर्यंत त्या कर्मचाऱ्याला ओव्हरटाइम दिला जातो. मात्र दुसऱ्या केंद्रावरही कर्मचारी उपलब्ध नसल्यास कर्मचाऱ्याला आठ तास ओव्हरटाइम देऊन थांबविले जाते. अनेक वेळा कामाची वेळ संपतासंपता एखाद्या दुर्घटनेची वर्दी आल्यानंतर घटनास्थळी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही काही तासांचा ओव्हरटाइम दिला जातो. परिणामी कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. काही जवानांना तर तीन महिन्यांमध्ये १५० ते २०० तास अतिरिक्त काम करावे लागत आहे. परंतु मोबदला केवळ ५० तासांचाच मिळतो.
अतिरिक्त कामाचा मोबदला संबंधित कर्मचाऱ्यांना मिळवून देण्याची जबाबदारी मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांची आहे. परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांकडे याबाबतचा प्रस्तावच सादर केलेला नाही.
तसा प्रस्ताव सादर केला असता तर हा मोबदला मिळू शकला असता. जवानांना हक्काची रजा देतानाही अनेक वेळा हात आखडता घेतला जातो. केवळ सुट्टीकालीन प्रवास भत्त्यासाठी कर्मचाऱ्यांना १३ दिवसांची रजा मंजूर केली जाते.
पालिका आयुक्त आणि मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी अतिरिक्त कामाचा पूर्ण मोबदला जवानांना द्यावा अन्यथा जवान अतिरिक्त काम करणार नाहीत, असा इशारा मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार संघटनेने पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे. यावर लवकर विचार झाला नाही, तर अग्निशमन दलामध्ये मोठे बंड होण्याची चिन्हे आहेत.