रबाळे एमआयडीसीतील क्वॉलिटी हर्बल कंपनीला मंगळवारी रात्री भीषण आग लागली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
क्वॉलिटी कंपनीत पावडर, सौंदर्य प्रसाधने तयार केली जातात. त्यासाठी लागणारा कागदी बॉक्सचा साठा कंपनीत करून ठेवण्यात येतो. या कागदी बॉक्सला आग लागल्यामुळे ही आग संपूर्ण कंपनीत पसरली होती. कंपनीमध्ये असलेल्या एक हजार लिटर क्षमतेच्या डिझेल टँकपर्यंत ही आग पोहोचली असती तर आगीने रौद्र रूप धारण केले असते. कंपनीला आग लागताच तेथील १० ते १२ कामगारांनी तात्काळ कंपनीबाहेर पळ काढून अग्निशमन दलाला माहिती दिली. वाशी, ऐरोली, ठाणे येथील अग्निशमन दलांच्या सात बंबांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. वित्तहानी मोठय़ा प्रमाणात झाली असली तरी सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.  विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या आधिकाऱ्यांनी व्यक्त केला.