शिक्षण हाच खरा विकासाचा मार्ग असून शिक्षणापासून वंचित राहिलेल्याने पिढय़ान् पिढय़ा कसे नुकसान झाले हे सांगताना बहुजन समाज व स्त्री-शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले यांनी विद्येविना गती गेली, गतीविना मती गेली, मतीविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले आणि इतके सारे अनर्थ एका अविद्येने घडल्याचे सांगत शिक्षणाची कवाडे सर्वसामान्यांसाठी खुली केली. त्याचीच शिकवण घेत दि. बा. पाटील यांनी रायगड व नवी मुंबईतील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या मुलांच्या शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालयांची उभारणी करून शिक्षण देण्याचे काम केले. त्यामुळे त्यांच्या या कार्याचे चिरंतन स्मारक उभारावे यासाठी प्रकल्पग्रस्तांनी स्थापन केलेल्या प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भूमिपुत्रांच्या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला दि. बा. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग नाव देण्यात आलेले असून या महाविद्यालयाच्या फलकाचे अनावरण मंगळवारी दिबांच्या प्रथम स्मृतिदिनी करण्यात आले आहे.
सहा वर्षांपूर्वी उरण तालुक्यातील सर्वपक्षीय नेते तसेच उरणमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन उरण तालुक्यात होणाऱ्या औद्योगिक विकासात येथील स्थानिक भूमिपुत्रांना मग तो प्रकल्पग्रस्त असो वा नसो त्याला येथील उद्योगात उच्चपदस्थ बनता आले पाहिजे. त्यासाठी उरणमध्येच उच्चतंत्रशिक्षणाची सोय करण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाची उभारणी करण्याचा निर्धार करून त्यासाठी उरण तालुका प्रकल्पग्रस्त शैक्षणिक व सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून सिडकोकडून उरण-पनवेल रस्त्यालगतची मोक्याची असलेली बोकडविरा येथील पाच एकर जमीन दोन कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलेली आहे. याकरिता उरणच्या जनतेने उत्स्र्फूतपणे निधी दिला आहे. या निधीत अनेकांनी आपल्या निवृत्तीनंतरची ठेव देऊन स्थानिक भूमिपुत्रांचे स्वप्न साकारण्याचा निर्धार व्यक्त केला आले. शासनानेही या जमिनीची किंमत कमी करण्यासाठी सिडकोला आदेश दिले होते. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी मोलाचे सहकार्य केले. या जागेवर प्रसिद्ध वास्तुविशारद चंद्रशेखर प्रभू यांनी तयार केलेल्या आराखडय़ानुसार पन्नास कोटी रुपये खर्चाचे सर्व सुविधांनी युक्त असे भव्य महाविद्यालय उभारण्याचा संकल्प संस्थेने सोडला आहे. या महाविद्याल्याची उभारणी जनतेच्या निधीतूनच करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलेला असला तरी उरणमधील उद्योगांकडूनही निधी जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या फलक अनावरणाच्या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर भोईर यांनी दहा लाखांची मदत जाहीर केली आहे. या वेळी दिबांचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन जेएनपीटीचे कामगार नेते भूषण पाटील, संस्थेचे अध्यक्ष दिनेश घरत, संतोष पवार, मेघनाथ तांडेल, काशिनाथ गायकवाड, सुरेश पाटील, सुधाकर पाटील यांनी केले आहे.