राष्ट्रीय वित्तीय शिक्षण केंद्रातर्फे राष्ट्रीय स्तरावर प्रथमच वित्तीय साक्षरता मूल्यमापन चाचणी घेतली जाणार आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांना नावनोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा स्तरावरून करण्यात आले आहे.
स्वामी विवेकानंद जयंतीदिनानिमित्त येत्या १२ जानेवारीला देशातील निवडक जिल्हय़ांत ही चाचणी होणार आहे. मराठवाडय़ातील औरंगाबाद व लातूरची निवड या चाचणीसाठी केली आहे. इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पनेवर आधारित ही चाचणी नि:शुल्क देता येईल. चाचणीच्या प्रश्नपत्रिकेतील ७५ वस्तुनिष्ठ प्रश्न ६० मिनिटांत सोडवावे लागतील. चाचणीत सहभागी विद्यार्थी व शाळांसाठी रोख पारितोषिके, स्मृतिचिन्हे व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. देशातील पहिल्या २५ शाळांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांची रोख पारितोषिके, पहिल्या १२० विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब्लेट व प्रत्येकी २ हजार रुपयांची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. सर्व सहभागी विद्यार्थी व शाळांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
परीक्षेची नावनोंदणी १ नोव्हेंबरपासून सुरू झाली. २९ नोव्हेंबपर्यंत ऑनलाईन सुरू राहणार आहे. परीक्षा अर्ज संबंधित शाळेतर्फे ऑनलाईन भरता येईल. अर्ज भरण्यासाठी व परीक्षा देण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. लातूरसह बीड, उस्मानाबाद, परभणी जिल्हय़ांतील विद्यार्थ्यांना लातूर केंद्रावर परीक्षा देता येईल.
परीक्षेचे अभ्यास साहित्य, माहितीपत्रक, भित्तिफलक व इतर माहितीसाठी लातूर केंद्राच्या समन्वयक डॉ. सारिका दायमा अथवा सेबी साधन व्यक्ती डॉ. ब्रीजमोहन दायमा यांच्याशी दयानंद महाविद्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.