शहरातील प्रसिध्द आंतरराष्ट्रीय चित्रकार बंधू राजेश व प्रफुल्ल यांनी पुन्हा एकदा आपल्या शिरपेचात आंतरराष्ट्रीय पुरस्कारााचा तुरा खोवला आहे. तुर्कस्तानमध्ये  इंटरनॅशनल वॉटरकलर सोसायटीतर्फे आयोजित स्पर्धेत प्रफुल्ल यांना सवरेत्कृष्ट चित्रकार म्हणून गौरविण्यात आले.
जलरंग माध्यमात ‘ऑन दी स्पॉट’ निसर्गचित्रण स्पर्धा, चित्र प्रदर्शनाचे आयोजन सोसायटीतर्फे करण्यात आले होते. त्यात कॅनडा, इंग्लड, अमेरिका, फ्रान्स, इटली, रशिया, जपानसह अनेक प्रमुख देशातील चित्रकारांना निमंत्रित करण्यात आले होते. उपक्रमात ‘बोनरेव्हा शहराचे सौंदर्य’ या विषयावर राजेश सावंत यांनी शहरातील १८ व्या शतकातील ऐतिहासिक वास्तू ‘ग्रीन मेन्शन’चे चित्रण केले. तर प्रफुल्ल यांनी ‘बोनरेव्हा ग्रॅण्ड बाजार’चे चित्र रेखाटले. सावंत बंधूची ही चित्रे दिग्गज चित्रकारांच्या परीक्षणानंतर अंतिम फेरीत पोहचली. त्यात प्रफुल्ल सावंत यांच्या चित्राला दोन लाख ६० हजाराचे प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले. तर,  राजेश सावंत यांना सहाव्या क्रमांकाचे ६५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत असे पारितोषिक मिळविणारे सावंत बंधू हे सर्वात कमी वयाचे चित्रकार ठरले.