मुंबईकरांच्या पाण्याची होत असलेली गळती रोखण्यासाठी आणि दूरध्वनी, गॅस आदी सेवा कंपन्यांच्या कामाचा जलवाहिनीला फटका बसून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पालिकेने जलवितरण कार्यक्रम हाती घेतला आहे. पाणीपुरवठय़ामध्ये सुधारणा करणे हे या कार्यक्रमाचे मूळ उद्दिष्ट असेल. त्यासाठी सर्वप्रथम जलवाहिन्यांचे जाळ्याचा नकाशा तयार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सध्या पालिकेच्या दोन विभाग कार्यालयांच्या हद्दीत सुरू आहे. त्यामुळे पहिल्यांदाच संपूर्ण मुंबईतील रस्त्याखालील जलवाहिन्या नकाशावर येणार आहेत.
मुंबईकरांच्या घरोघरी पाणी पोहोचविणारी जलवाहिनी रस्त्याखालून कशी गेली आहे याची माहिती आजघडीला पालिका दरबारी नाही. त्यामुळेच रस्ते दुरुस्ती, सेवा उपयोगिता कंपन्यांकडून करण्यात येणारे खोदकाम आदींच्या निमित्ताने जलवाहिन्या फुटून मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होतो. तसेच जीर्ण जलवाहिनीतून होणारी गळती शोधण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. या गळतीमुळे रस्ते खचून नव्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ पालिकेवर येते. त्यामुळे पालिकेच्या जल विभागाने जलवितरण सुधारणा कार्यक्रम हाती घेतला आहे.
या कार्यक्रमांतर्गत जलवाहिन्यांचे सर्वेक्षण व भौगोलिक माहिती प्रणाली आधारित नकाशे तयार करण्यात येणार आहेत. पाण्याचे समान वाटप, पाणी वितरण विभाग तयार करणे, पाण्याच्या दाबाचे व्यवस्थापन करणे, गळती अन्वेषण, ग्राहकांचे सर्वेक्षण व त्यांची माहिती, ग्राहक संबंध व्यवस्थापन, मालमत्तांची नोंदणी, झोपडपट्टीतील पाणीपुरवठय़ात सुधारणा, पाण्याची गुणवत्ता व अहवाल, प्रशिक्षण व ज्ञानप्राप्ती आढावा इत्यादींचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. जलवितरण सुधारणा कार्यक्रमाची जबाबदारी पालिकेने ‘सुएझ एन्व्हायरन्मेंट इंडिया’ या कंपनीवर सोपविली आहे.
जलवाहिन्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे संगणकीय नकाशे तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे पालिकेला जलवितरण व्यवस्थेच्या भौगोलिक स्थितीचे नकाशे तयार करणे शक्य होईल. सध्या पालिकेच्या एम-पश्चिम म्हणजेच वांद्रे, खार, तसेच टी म्हणजेच मुलुंड परिसरातील भूमिगत जलवाहिन्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. येत्या चार महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा पालिका अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या परिसरातली काम यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण मुंबईतील जलवाहिन्यांच्या जाळ्यांचा शोध घेऊन त्या नकाशाबंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणीपुरवठय़ातील अनेक त्रुटी दूर होतील आणि मुंबईकरांना मुबलक पाणी मिळू शकेल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

याने काय होईल?
जलवाहिन्यांचे वयोमान, प्रकार, गळती व दुरुस्ती, नवीन जलजोडणी इत्यादींची नोंद करता येईल.
गॅस, मलनिस्सारण वाहिन्या, दूरसंचार, वीजपुरवठा इत्यादी सेवा वाहिन्यांची स्थितीही समजू शकेल.
रस्ते दुरुस्ती व इतर कामांमुळे जलवाहिन्यांचे होणारे नुकसान टळेल.
काही ठिकाणी रस्त्याखालील जुन्या जलवाहिन्या बंद करण्यात आलेल्या नाहीत. अशा जलवाहिन्यांचा शोध घेऊन त्या बंद केल्या जातील. यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल.