करंजा समुद्रकिनाऱ्यावर उभारण्यात येणाऱ्या करंजा टर्मिनलच्या जेटीमुळे उरण तालुक्यातील करंजासह खोपटे खाडी परिसरातील स्थानिक मच्छीमारांच्या व्यवसायावरही परिणाम होणार असून करंजा विभागातील मच्छीमारांप्रमाणेच येथील उरण (पूर्व) विभागातील मच्छीमारांनाही नुकसानभरपाई देऊन त्यांचे पुनर्वसन करावे या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी उरण तहसील कार्यालयावर उरण सामाजिक संस्थेच्या वतीने खोपटे खाडी परिसरातील शेकडो मच्छीमारांनी आपल्या पारंपारिक मच्छीमारी साधने तसेच वेशात मोर्चा काढला होता. या वेळी काम बंद करण्याची मागणी करण्यात आली.
करंजा-कोंढरीपाडा परिसरात करंजा टर्मिनल हे खासगी बंदर उभारले जाणार आहे. या बंदराच्या खाडीतील एक किलोमीटरच्या जेटीसाठी मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे खोपटा परिसरातील गोवठणे, खोपटे, कोप्रोली, विंधणे, आवरे, दिघोडे, मोठीजुई, कुंडेगाव, बोरखार, केळवणे आदी गावांतील शेकडो स्थानिक मच्छीमारांच्या पारंपरिक व्यवसायावर परिणाम होणार आहे. करंजा खाडीत उभारल्या जाणाऱ्या जेटीमुळे खोपटे खाडीत येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होणार असल्याने या वेगाने येणारी खाडीतील मासळीचे प्रमाणही घटण्याची शक्यता आहे.
बंदर निर्माण झाल्यानंतर या परिसरातून समुद्रात जाणाऱ्या मच्छीमार बोटींना जाण्यासाठी मार्ग दिला जाणार आहे का, असाही सवाल येथील मच्छीमारांनी उपस्थित केला आहे. तसेच सध्याच्या भरावामुळे काय परिणाम होतो याची पाहणी कंपनीने स्वत: या परिसरात जाळ टाकून करावी, अशी मागणी वंदना कोळी यांनी केली आहे. मच्छीमारांच्या समस्यांसंदर्भात उरण सामाजिक संस्थेच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी उरणचे माजी आमदार विवेक पाटील, जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील, संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, संतोष पवार, संजय ठाकूर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा राघोबा मंदिर येथून काढण्यात आला होता. मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेच्या वेळी करंजा टर्मिनल, मत्स्यव्यवसाय अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. या वेळी करंजा टर्मिनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय मेहता यांना ४ फेब्रुवारी रोजी महिनाभरात मच्छीमारांचा सव्‍‌र्हे करून नुकसानभरपाई न दिल्यास कंपनी स्वताच भरावाचे काम बंद करील, असे लेखी आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी करून प्रथम सव्‍‌र्हे व नुकसानभरपाईनंतर काम सुरू करा, अशी मागणी या वेळी मच्छीमारांनी केली. तसे न झाल्यास होळीचा सण खाडीकिनारी साजरा करण्याचा इशारा मच्छीमारांनी दिला आहे.