गुजरातच्या दिशेने येणाऱ्या निलोफर वादळाच्या इशाऱ्यानंतर दक्षता म्हणून उरण तालुक्यातील करंजा व मोरा बंदरातील शेकडो बोटी खोल समुद्रातील मासेमारीवरून परतल्या असून या बोटींचे चक्रीवादळाच्या काळात नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाच्या सावधानतेच्या सूचनेनुसार दोन्ही बंदरांत मच्छीमारांनी आपल्या बोटी नांगरल्या आहेत. तसेच चक्रीवादळाचा फटका उरणच्या किनारपट्टीला बसण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने उरण किनारपट्टीचे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले असून येथील खाडी व समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांना दक्षतेचा व सावधानतेचा इशाराही देण्यात आलेला आहे. निलोफर वादळाचा फटका उरण परिसरातील समुद्रकिनाऱ्यालाही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे उरणमधील प्रशासनाने वादळातील जास्तीतजास्त नुकसान टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार काही उपाययोजना केल्या आहेत. निलोफर चक्रीवादळामुळे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. वादळामुळे जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी येथील नागरिकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा देत वादळामुळे समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी समुद्रात व किनाऱ्यावर जाऊ नये, समुद्रकिनाऱ्यावर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी व पर्यटकांनीही या कालावधीत किनाऱ्यावर जाऊ नये, नागरिकांनी सुरक्षित स्थळी आसऱ्याची व्यवस्था करावी, आवश्यक भासल्यास स्थलांतरासाठी तयार राहणे, वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांनी केले आहे. या कालावधीत सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. उरणच्या किनाऱ्यावर पाळत ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी झालेल्या चक्रीवादळाचा फटका येथील मच्छीमार बोटींना होऊन बोटींचे नुकसान झाल्यानेच मच्छीमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे.