जीटीआय या खासगी बंदरात कार्यरत असलेल्या व येथील कामगार संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या चार स्थानिक कामगारांना स्थानिकांची नोकरभरती व्हावी यासाठी केलेल्या आंदोलनामुळे मे २०१२ ला बडतर्फ करण्यात आलेले होते. या विरोधात दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करून कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याची मागणीही करण्यात आलेली होती. याची चर्चा मागील दोन  वर्षे सुरू होती अखेरीस जीटीआय व्यवस्थापनाने बडतर्फ कामगारांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई दिल्याने दोन वर्षांपासून बडतर्फ असलेल्या चार जीटीआय कामगारांना न्याय मिळाला आहे.मात्र त्यांची बदली कामगार घेण्याची मागणी मान्य झालेली नाही.
जीटीआय बंदरात स्थानिकांची नोकरभरती व्हावी अशी मागणी येथील स्थानिक कामगार संघटनेने केलेली होती. त्यासाठी ३० मे २०१२ रोजी कामगारांनी काम बंद आंदोलन केलेले होते. या आंदोलनाचे नेतृत्व हिराचंद तांडेल (करळ), मृत्युंजय पाटील(जासई), अमित ठाकूर (धुतूम) व अजय म्हात्रे (बेलपाडा) यांनी केल्याने त्यांना जीटीआय व्यवस्थापनाने बडतर्फ केलेले होते. बडतर्फ स्थानिक कामगारांना त्वरित कामावर घ्या या मागणीसाठी अनेकदा प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षी संघर्ष समितीने जीटीआयच्या गेटसमोर आंदोलन केले होते. दोन वर्षे चार महिने होऊनही प्रश्न न सुटल्याने अखेरीस समितीने जीटीआयकडे दहा लाखांच्या नुकसानभरपाईची मागणी करण्यात आलेली होती, मात्र जीटीआयने पाच लाख देण्याचे मान्य केल्याने कामगारांनी पाच लाखांची नुकसानभरपाईची रक्कम स्वीकारली असल्याची माहिती हिराचंद तांडेल या कामगारांनी दिली आहे.