कुपवाड औद्योगिक वसाहतीत सशांची शिकार करणा-या पाच जणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांची रवानगी कोठडीत केली आहे. या संदर्भात पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्स संघटनेने मृत सशांचे पुरावे सादर करीत वन विभागाकडे पाच जणांविरुद्ध तक्रार दिली होती.
    कुपवाड औद्योगिक वसाहतीतील शिमोगा केमिकल्समध्ये उत्तर प्रदेशमधील कामगारांनी सशाची शिकार केली होती. या कारखान्याच्या समोर असणा-या खुल्या मदानात येणा-या सशांची शिकार वारंवार केली जात असल्याची माहिती पीपल्स फॉर अ‍ॅनिमल संघटनेचे अशोक लकडे व किरण नाईक यांना मिळाली होती. शनिवारी रात्री महंमद निजाम मुजावर (रा. सांगली), रमेश सनी, संतोष कुमार, बाबुराव कांबळे व मिरजीलाल (सर्व रा. उत्तर प्रदेश) या पाच जणांनी दोन सशांची शिकार केली होती. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन मृत सशांचे अवयव हस्तगत करून वन विभागाच्या ताब्यात दिले आहेत. वन विभागाने वरील पाच जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या पाच जणांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.