नाकाबंदीच्या नावाखाली बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करून आराम करणाऱ्या पाच पोलिसांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. उत्तर प्रादेशिक परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त किशोर जाधव यांनी ही कारवाई केली.
सोनसाखळी चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस रस्त्यावर बॅरिकेड्स लावून नाकाबंदी करतात. मंगळवारी उत्तर प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त किशोर जाधव रस्त्याने जात असता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ बॅरिकेड्स लावून नाकांबदी करण्यात आलेली दिसली. मात्र तेथील पोलीस व्हॅनच्या आड बसून गप्पागोष्टी करताना आढळले. त्यांनी किती गाडय़ांची तपासणी केली याची माहितीही त्या पोलिसांना देण्यात आली. या पाच पोलिसांना जाधव यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची बढती रोखण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. हे पाचही पोलीस कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. पोलिसांनी कर्तव्यात कसलीच कसूर ठेवता कामा नये. एकीकडे शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या असताना पोलिसांनी अशा प्रकारे कर्तव्यात कसूर करणे गंभीर बाब आहे. म्हणून त्यांच्यावर नोटिसा बजावल्याचे जाधव यांनी सांगितले.