उरणच्या खाडीकिनाऱ्यावर असलेल्या परिसरात दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासूनच हजारो मैलांचा प्रवास करीत हवामान बदलासाठी येणाऱ्या फ्लेमिंगो या परदेशी पक्ष्यांचे आगमन होते. त्यानुसार याही वर्षी हजारो पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. परदेशी पक्ष्यांचे या परिसरातील आगमन हे पक्षीमित्रांसाठी आनंदाची गोष्ट असली, तरी सध्या जगात प्रतिबंधित असलेल्या या संरक्षित जातीच्या पक्ष्यांच्या शिकारीचेही प्रकार उघडकीस येऊ लागल्याने उरण परिसरातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, या परिसरातील शिकाऱ्यांच्या पाळतीमुळे फ्लेमिंगोंच्याच जीवाला धोका निर्माण झाल्याची भीती पक्षीमित्रांकडून व्यक्त केली जात आहे.
सैबेरिया तसेच इतर देशांतून विविध जातीचे पक्षी दरवर्षी भारतातील विविध ठिकाणी येतात. यापैकी अनेक पक्षी उरण परिसरातही वास्तव्य करीत असतात. उरण परिसरात असलेल्या खाडीकिनाऱ्यावर या पक्ष्यांचे मुख्य खाद्य असलेले मासे, किडे यांचा मोठा साठा असल्याने मोठय़ा संख्येने पक्षी येत असतात. त्यामुळे या विविध जातींच्या पक्ष्यांना न्याहाळणे, त्यांचा अभ्यास करण्यासाठी पुणे, मुंबई, ठाणे तसेच रायगड जिल्ह्य़ांतील पक्षीमित्र आणि अभ्यासकही आवर्जून येतात. या परिसरात सुरू असलेल्या मातीच्या भरावामुळे खाडीचा भाग कमी होऊ लागल्याने खाडीकिनाऱ्यावरील पक्ष्यांची संख्या कमी झाली असली, तरी पाणजे गावाला लागून समुद्र असल्याने येथील समुद्रकिनाऱ्यांवर दरवर्षी हजारो पक्षी येत आहेत.
याची सुरुवात झाली आहे. मात्र मागील वर्षी याच परिसरात फ्लेमिंगोंची शिकार करून त्यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. तसे काही पुरावेही मिळालेले होते. तर पाच वर्षांपूर्वी याच परिसरात झालेल्या शिकारी प्रकरणी नवी मुंबईतील काहींना अटकही करण्यात आली होती. त्यामुळे उरण परिसरात येणाऱ्या पक्ष्यांच्या सुरक्षेचाच प्रश्न आता ऐरणीवर आला असल्याचे मत पक्षीमित्र आनंद मढवी यांनी व्यक्त केले आहे.