राजकारणात मोठमोठे पक्ष कसे एका ‘बाई’च्या दावणीला बांधलेले आहेत, याबाबतची वर्णने गेली अनेक वर्षे राजकीय भाषणांतून सातत्याने केली गेली आहेत. मात्र दक्षिण मुंबईतील शेअर टॅक्सीचालक आणि फेरीवाले यांना सध्या एका बाईने प्रचंड हैराण केले आहे. ही बाई शेअर टॅक्सीच्या आसपास दिसल्यानंतर टॅक्सीवाले लपतात, तर फेरीवालेही वेळप्रसंगी तिच्याशी वाद नको म्हणून आपापले ठेले सोडून निघून जातात. मंगळवारी तर या बाईने दोन शेअर टॅक्सी चालकांच्या श्रीमुखात भडकावली आणि चिडलेल्या टॅक्सी चालकांनी थेट संपाचे हत्यार उपसले. चर्चगेट स्थानकाच्या बाहेरून निघणाऱ्या शेअर टॅक्सी मंगळवारी या कारणामुळे तब्बल तीन तास बंद होत्या.

नरिमन पॉइंट येथील मेकर चेंबर्स-३ येथे काम करणारी ही मध्यमवयीन महिला दिसताच चर्चगेट स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या शेअर टॅक्सी चालकांची पळापळ सुरू होते. या बाई टॅक्सीत बसून दुसरा टॅक्सीवाला कसा मूर्खपणे गाडी चालवतो, तुम्ही टॅक्सी कशी चुकीच्या पद्धतीने उभी करता याबाबत टिपण्णी करतात. त्यांना चांगल्या शब्दांत काही सांगायला गेले, तर आई-बहिणीवरून अश्लील शिव्या द्यायला सुरुवात करतात. महिला असल्यामुळे आपण त्यांना काही बोलूही शकत नाही, अशी हतबलता शेअर टॅक्सीचालक फिरोज खान यांनी व्यक्त केली.
मंगळवारी या बाईंनी अशाच प्रकारे दोन टॅक्सी चालकांशी भांडण उकरून काढले. वैतागलेल्या टॅक्सी चालकांनी, ‘आपका भाडा लेना ही नहीं’ असे सांगितल्यावर या बाईंनी त्यांना शिव्या देत दोघांच्या कानशिलात लगावली. घडल्या प्रकाराने अवाक् झालेल्या शाहिद इनामदार या टॅक्सी चालकाने मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. टॅक्सी चालकांनी ताबडतोब शेअर टॅक्सी सेवा बंद करून या गोष्टीचा निषेध केला. तीन तास चाललेल्या या बंदमुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले.
या बाई केवळ टॅक्सी चालकांनाच नाही, तर आसपासच्या फेरीवाल्यांना व सार्वजनिक प्रसाधनगृहाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही असाच त्रास देतात, असे काही टॅक्सीचालकांनी सांगितले. सार्वजनिक प्रसाधनगृहाच्या कर्मचारी महिलेने तर या बाईंना झाडूने मारले होते. तेव्हापासून त्या तेथे त्रास द्यायला जात नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. यापुढेही या बाईने आम्हाला त्रास दिला, तर आम्ही आमच्या बायकांना बोलावून त्यांना चोप देणार आहोत, असे या टॅक्सी चालकांनी सांगितले. याबाबत सदर महिलेशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.