फ्लेमिंगोंचे गाव असे म्हटले की, पूर्वी केवळ गुजरातची किनारपट्टी आठवायची.. पण आता गेली सुमारे सात- आठ वर्षे फ्लेमिंगोंनी मुंबईच्या खाडीकिनारी शिवडीला आपले नवे गाव वसवले आहे. त्यामुळे अधुनमधून त्यांची छायाचित्रे वर्तमानपत्रात झळकतच असतात. त्यांचे थवेच्या थवे खाडीकिनारी मान खुपसून बसलेले किंवा उडताना दिसतात.. पण फ्लेमिंगो म्हणजे याशिवायही खूप काही आहे. ते खूप काही पाहायचे असेल तर खरे तर शिवडीच्या किनाऱ्यावर दिवसरात्र डेराच टाकायला हवा. पण त्यातही डेरा न टाकता तो अनुभव घ्यायचा असेल तर मात्र जहांगीर कलादालनाला भेट द्यावी लागेल. सुरेश तारकर या छायाचित्रकाराने जहांगीरवरच्या टेरेस कलादालनात आता फ्लेमिंगोंचे नवे गाव छायाचित्रांच्या माध्यमातून वसवले आहे. गेली पाच वर्षे सुरेश दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांमध्ये शिवडीला जाऊन डेरा टाकायचे आणि छायाचित्रे टिपायचे. त्यामुळे या ४० छायाचित्रांमध्ये फ्लेिमगोंचे वेगवेगळ्या वेळचे विविध मूडस् पाहायला मिळतात. त्यात प्रणयाराधनापासून ते विहाराच्या विविध प्रकारांपर्यंत सारे काही आहे. यात केवळ फ्लेमिंगोच नाहीत तर शिवडी किनाऱ्यावर दिसणारे इतर चित्ताकर्षक पक्षीही आहेत. त्यातील मासा पकडून उडनच्छू होणाऱ्या सीगलचे आणि त्याच्या तोंडातील मासा कधी पडतो याकडे लक्ष लावून उडणारे इतर सीगल असे एक नाटय़ात्म छायाचित्रही यात आहे.
१९८५ साली जेजे कला महाविद्यालयातून फोटोग्राफी हा विशेष विषय घेऊन तारकर पदवीधर झाले. त्यानंतर सुमारे पाच वर्षे त्यांनी जाहिरात संस्थेत काम केले आणि आता गेली अनेक वर्षे ते मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात छायाचित्रकार म्हणून कार्यरत आहेत. पल्स पोलिओ किंवा मलेरिया निर्मूलन या सारख्या रूक्ष विषयांवर काम करतानाही त्यांनी त्यांच्यातील संवेदनशीलता चांगलीच  जपल्याचे या छायाचित्रांतून जाणवते. त्यांना यापूर्वी राज्य कला पुरस्कार आणि ललित कला अकादमी पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. तर मानाचा समजला जाणारा केकी मूस पुरस्कार त्यांना गेल्यास वर्षी मिळाला. त्यांचे हे प्रदर्शन जहांगीरच्या टेरेस गॅलरीत ७ ते १४ फेब्रुवारी या दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहाता येईल. प्रसिद्ध छायाचित्रकार व विधिज्ज्ञ अ‍ॅड. अधिक शिरोडकर आणि प्रसिद्ध छायाचित्रकार विलास भेंडे यांच्याहस्ते त्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.