दिवाळीच्या निमित्ताने झेंडूच्या फुलांची विक्री करण्यासाठी पुणे जिल्हय़ातील शेतकरी वाशीत दाखल झाले आहेत. वाशीतील शिवाजी चौक परिसर हा झेंडूच्या फुलांनी भरलेला आहे. ऑक्टोबर हीट आणि अवकाळी बरसणाऱ्या सरींनी मात्र शेतकऱ्याला नाराज केले आहे. वाढत्या उष्म्यामुळे झेंडूची फुले कोमेजू लागल्याने ७० ते ८० रुपये किलोने विक्री करावी लागत आहे. भाव उतरल्याने ग्राहक मात्र आनंदी असून फुलांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.
ग्रामीण भागात तसेच व्यापाऱ्याकडून मिळणाऱ्या भावापेक्षा थेट फुलांची विक्री केल्याने शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळत आहे. यामुळे पुणे जिल्हय़ातील अनेक शेतकरी पनवेल आणि वाशी परिसरात फुलांची विक्री करण्यासाठी दाखल होत आहे. या वर्षी पिवळा आणि लाल रंगाचा गोंडा, शेवंती आणि अष्टरच्या फुलांना चांगली मागणी आहे. झेंडूच्या फुलाचे उत्पन्न अधिक झाल्याने यंदा गतवर्षीच्या तुलनेत दर उतरले आहेत.  झेंडूसह शेंवतीचीदेखील फुले बाजारात असून या फुलांचा भाव ७० ते ८० रुपये प्रतिकिलो आहे. गेल्या वर्षी १०० ते १२० रुपये किलो दराने फुलांची विक्री करण्यात आली होती. नवी मुंबईतील वाशी, कोपरखरणे डी मार्ट, सीबीडी येथील सिडको कार्यालयानजीक फूलबाजार थाटला आहे. मात्र सध्या ऑक्टोबर हीटमुळे फुले कोमजली आहेत. त्याचप्रमाणे गोणीत असलेली फुले खराब होत असल्याने लवकरात लवकर फुलांची विक्री करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याने भाव पाडून फुलांची विक्री करण्यात येत आहे.
मागील वर्षांच्या तुलनेत यंदा हवामानात होणारा बदल पाहता त्याचा फटका सर्वच फुलांना बसला आहे. त्यामुळे यंदा दिवाळीसाठी फुलांची तोरणे, सजावटीसाठी असणारे गजरे-हारही स्वस्त झाले आहेत. काही ठिकाणी झालेल्या पावसाचा फुलांना फटका बसला आहे.
अनंता बोऱ्हाडे, शेतकरी