ठाण्याचे नवे उपनगर म्हणून गेल्या काही वर्षांपासून झपाटय़ाने विकसित होत असलेल्या घोडबंदर परिसराला वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने आखलेल्या कापूरबावडी पुलाची नाशिकच्या दिशेने जाणारी मार्गिका गुरुवारी खुली करून राज्य सरकारने या पुलाच्या उभारणीतील चौथा आणि महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला. ही मार्गिका खुली झाल्याने घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी चौकातील वाहतुकीला काहीसा दिलासा मिळणार असला तरी घोडबंदरहून मुंबईच्या दिशेने जाणारी मार्गिका रखडल्याने गुरुवारचा शुभारंभ सोहळा म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर ठाणेकरांना दाखविलेले गाजर असल्याचे स्पष्ट होत आहे. घोडबंदरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा आकडा बराच मोठा असून ही मार्गिका जोपर्यंत खुली होत नाही, तोपर्यंत घोडबंदरचे प्रवेशद्वार कोंडीमुक्त करण्याची भाषा म्हणजे केवळ दिवास्वप्न असल्याची प्रतिक्रिया वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलीस अधिकारी दबक्या आवाजात व्यक्त करत आहेत. घोडबंदर मार्गावरील मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ आणि कापूरबावडी पुलाची एक मार्गिका यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. तरीही नाशिकच्या दिशेने जाणारी मार्गिका बंद असल्याने उरणच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमधून ये-जा करणारी वाहने घोडबंदरचे प्रवेशद्वार रोखून धरत असत. नव्या मार्गिकेमुळे कापूरबावडी चौकात अवजड वाहनांचा फेरा कमी होईल, अशी चिन्हे आहेत. मात्र अशा वाहनांचा आकडा जेमतेम १० टक्के इतकाच आहे. त्यामुळे कापूरबावडी चौक कोंडीमुक्त होईल, असा दावा करणे धाडसाचे ठरणार आहे. खरेतर घोडबंदरहून मुंबईच्या दिशेने जाणारी मार्गिका सुरू झाली तर कापूरबावडी चौकातील ८० टक्के वाहने परस्पर वळती होऊ शकणार आहेत. असे झाल्यास या मार्गावरील प्रवेशद्वार कोंडीमुक्त होईल. त्यामुळे ही मार्गिका सुरू व्हावी, असा आग्रह अगदी सुरुवातीपासून धरला जात आहे. मंगळवारी शिवसेनेच्या काही स्थानिक नेत्यांनी नाशिककडे जाणारी मार्गिका खुली करून नेहमीप्रमाणे शायिनग आंदोलनाचा घाट घातला. त्यामुळे सरकारनेही घाईगडबडीत ही मार्गिका खुली करून ठाणेकरांपुढे श्रेयाचे प्रदर्शन घडविल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.

पुलासाठी खटपट
ठाणे येथील घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी चौकातील उड्डाणपूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उभारला असून त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई विस्तारित नागरी सुविधा प्रकल्पांतर्गत निधी उपलब्ध करून दिला होता. कापूरबावडी उड्डाणपुलासाठी सुमारे १९७ कोटी १४ लाख रुपये खर्च झाला असून या उड्डाणपुलाची एकूण लांबी ३८५० मीटर इतकी आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या उड्डाणपुलावरील मुंबईहून घोडबंदरच्या दिशेने जाणारी १०९० मीटरची मार्गिका राज्य शासनाने वाहतुकीसाठी खुली केली होती. त्यासाठी खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाचारण करण्यात आले होते. ही मार्गिका खुली झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तरीही घोडबंदर-मुंबई ही आणखी एक मार्गिका लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. असे झाले असते तर घोडबंदर मार्गावरील कोंडीचा प्रश्न जवळपास सुटल्यात जमा होता. मात्र आधीच रखडलेल्या या पुलाची आणखी एक महत्त्वाची मार्गिका वेळेत सुरू करणे अजूनही रस्ते विकास महामंडळाला जमलेले नाही.
नवी मार्गिका सुरू
गुरुवारी याच पुलावरील घोडबंदरहून-माजिवाडा तसेच कशेळी या दिशेने जाणारी १३०० मीटर लांबीची मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. यापूर्वी या मार्गावरील हलकी आणि जड वाहने उड्डाणपुलाखालून जात होती. रात्रीच्या वेळेत घोडबंदरहून येणारी अवजड वाहने जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्यांसाठी माजिवाडा तसेच कशेळी मार्गाचा मोठय़ा प्रमाणात वापर करीत होते. त्यामुळे कापूरबावडी उड्डाणपुलाखाली मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत होते. मात्र ही वाहने आता उड्डाणपूलमार्गे जाणार असल्यामुळे या चौकातील वाहतूक कोंडी काहीशी कमी होईल, अशी माहिती वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तरीही कोंडीमुक्त घोडबंदरसाठी आणखी काही महिने वाट पाहावीच लागणार आहे.