कुपोषण निर्मूलनामध्ये अन्नसुरक्षेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. अन्न आणि पाणी यांची सुरक्षितता पाळल्यास अनेक आजारांना दूर ठेवता येते, असे प्रतिपादन नागपूर विभागाचे आरोग्य संचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी केले.
जागतिक आरोग्य दिन आणि बाल आरोग्य अभियानानिमित्त आरोग्य उपसंचालक कार्यालयातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आरोग्य उपसंचालक कार्यालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पद्मजा जोगेवार होत्या. डागा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. फारुकी, सहायक संचालक डॉ. माध्यमा चहांदे, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. एफ.ए. मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. पद्मजा जोगेवार म्हणाल्या, आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता तसेच परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अन्न सुरक्षिततेच्या पाच नियमांचे पालन विविध पातळीवर करणे आवश्यक आहे. बाल आरोग्य अभियानानिमित्त या संदेशाचा प्रसार आणि प्रचार करावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. लहान बालकांना दूध पाजतांना कोणती काळजी घ्यावी, याची माहिती डॉ. फारूकी यांनी याप्रसंगी दिली.
सुरक्षित अन्न पदाथार्ंची निवड, अन्नातून होणारा जंतूसंसर्ग, अन्न विषबाधा, अन्नातून होणाऱ्या विविध आजारांची माहिती वैज्ञानिक अधिकारी आर.पी. रोकडे यांनी दिली. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या ‘शेतापासून ताटापर्यंत, अन्न सुरक्षित ठेवा’ या घोषवाक्याची माहितीही त्यांनी दिली. घरच्या घरी सोप्या पध्दतीने अन्न पदार्थातील भेसळ कशाप्रकारे ओळखावी, याची माहिती वरिष्ठ तांत्रिक सहायक मीना टिडानी यांनी दिली. यानिमित्त ‘अन्नभेसळ व त्याचे दुष्परिणाम’ डॉ. स्वाती घोडमारे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका विशद केली. सांख्यिकी पर्यवेक्षक राकेश चव्हाण यांनी संचालन केले तर वरिष्ठ पोषाहार तज्ज्ञ सुषमा चॅटर्जी यांनी आभार मानले. कार्यक्रमास पोषाहार विभागाचे अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी आरोग्य सेवक उपस्थित होते.