छेडछाडीला विरोध करण्याच्या प्रयत्नात डोंबिवली येथे एका किशोरवयीन युवकाची हत्या करण्यात आली. याप्रकरणात अटक केलेले सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. गुन्हेगारी कृत्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढत असलेला सहभाग आता चिंतेची बाब बनत चालली आहे.
मुंबईत बलात्कार, विनयभंग आणि वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे ‘प्रजा’ संस्थेने आपल्या अहवालात म्हटले होते. याशिवाय इतर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. २०१० या वर्षांत एकूण गुन्ह्यांपेकी ४० टक्के गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग होता. तर खून, खुनाचा प्रयत्न, दंगल माजविणे अशा गुन्ह्यांमध्ये ३२७ मुलांना अटक करण्यात आली होती. २०११ मध्ये एकूण ८०४ बाल गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती.
१८ वर्षांच्या आतील गुन्हेगारांना बालगुन्हेगार म्हणून संबोधले जाते. किरकोळ गुन्ह्यात त्यांचा सहभाग असायचा. परंतु गेल्या दोन तीन वर्षांमध्ये गंभीर गुन्ह्यात या मुलांचा सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे. बाल गुन्हेगारांमध्ये मुख्यत: झोपडपट्टीत राहणारे किंवा रस्त्यावर भीक मागणारे यांचा समावेश असतो, असा समजही खोटा ठरू लागला आहे. मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय मुलांचाही गुन्ह्यांमध्ये सहभाग वाढू लागला आहे. पैशांची गरज, चंगळवादी वृत्ती यासाठी ही मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याचे दिसत आहे. दोन महिन्यांपूर्वी विनोबा भावे मार्ग पोलिसांनी मोटारसायकली चोरणाऱ्या टोळीला अटक केली होती. त्यातील मुख्य अल्पवयीन आरोपी हा एका पोलीस हवालदाराचा मुलगा होता.
किरकोळ गुन्ह्यांव्यतिरिक्त गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. मारहाण करून गंभीर दुखापत करण्याच्या गुन्ह्यांमध्ये २००९ मध्ये १६६ बालगुन्हेगारांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात वाढ झाली आहे. २०११ मध्ये अशाच स्वरूपांच्या गुन्हयात २४० बालगुन्हेगारांना अटक करण्यात आली. बलात्कार, विनयभंग, लैंगिक छळ आदी गुन्हयांमध्येही बालगुन्हेगारांचे प्रमाण वाढत आहे. २००९ मध्ये या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये ४२ बालगुन्हेगारांना अटक झाली होती. त्यात २०११ मध्ये वाढ झाली आणि ५९ मुलांना अटक करण्यात आली होती. प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलींना पळवून नेले जाते. अशा प्रकरणाता या मुलांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. तो तांत्रिक असतो. परंतु एकंदरीतच खून, बलात्कार आणि गंभीर स्वरूपाची दुखापत आदी गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगारांचा वाढत असलेला सहभाग हा धोक्याचा इशारा मानला जात आहे.