कारवाईची भीती दाखवून एका सुताराकडून वीस हजार रुपये लाच स्वीकारल्याप्रकरणी तुमसर तालुक्यातील एका वनक्षेत्र सहाय्यकास भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या पथकाने बुधवारी रात्री पकडले.  
सय्यद शकील सय्यद सलाम हे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो भंडारा जिल्ह्य़ातल्या तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनक्षेत्र सहायक आहे. या प्रकरणातील फिर्यादी हा डोंगरी बुजूर्ग येथील मँगनीज खाणीत नोकरी करून फावल्या वेळेत सुतारकाम करतो. गेल्या आठवडय़ात त्याने तुमसरहून लाकूड खरेदी केले होते.
२० जानेवारीला तो घरी फर्निचर तयार करीत असताना वन खात्याच्या नाकाडोंगरी कार्यालयातील ५-६ कर्मचारी त्याच्याकडे आले.
एक लाकडी पलंग व लाकुड जप्त केले आणि त्याला वन खात्याच्या नाकाडोंगरी कार्यालयात बोलावले. तेथे गेल्यानंतर तेथील वनक्षेत्र सहायक सय्यद शकील सय्यद सलाम याने ‘तू चुकीचे काम करतोस. सागवानाचे झाड जंगलातून चोरून त्याचे फर्निचर बनवून लोकांना विकतोस. तुझावर केस करतो’ अशी दमदाटी केली. कारवाई टाळण्यासाठी वीस हजार रुपये घेऊन त्याने बुधवारी बोलावले. सुताराने भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या भंडारा कार्यालयात तक्रार केली.
त्यानुसार काल बुधवारी सायंकाळी वन खात्याच्या नाकाडोंगरी कार्यालयात भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याचे उपअधीक्षक प्रशांत कोलवाडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. सुतार कार्यालयात गेला तेव्हा सय्यद नव्हता. रात्री उशिरा तो आला. त्याने सुताराकडून वीस हजार रुपये स्वीकारल्यानंतर त्याला पथकाने पकडले.