मुंबई विद्यापीठाच्या १५८ स्थापना दिनाच्या निमित्ताने ठाण्यातील ‘राष्ट्रीय सेवा योजने’च्या (एनएसएस) माध्यमातून महावृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात वांगणी रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुडसवरे या गावात तब्बल ५० हजार रोपे लावण्यात येणार असून सुमारे तीन हजार विद्यार्थी प्रतिनिधी या मोहिमेत सहभागी होणार आहेत. यावेळी वृक्षदिंडीही आयोजित करण्यात आली आहे.
वृक्षारोपणाकरिता निवडण्यात आलेला परिसर हा तब्बल ६० एकरच्या जंगलाचा भाग आहे. आवळा, खैर, विलायती चिंच, कांचन, बेहडा, भेंडी, बांबू, अर्जुन आदी विविध झाडांची रोपे यावेळी लावण्यात येणार आहेत. विद्यापीठाचा एनएसएस विभाग आणि ठाण्याच्या सामाजिक वने विभागाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वृक्षारोपणानंतर ५० महाविद्यालयांच्या वतीने त्यांची निगा राखली जाईल. ठाण्याबरोबरच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथेही १० हजार रोपे लावण्यात येणार आहेत.