वाघांना खाद्य उरले नाही म्हणून जंगलात गाई बांधून ठेवण्याचा अजब प्रकार नागपूरलगतच्या उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात सुरू झाला आहे. शासनाच्या गोहत्या बंदीच्या घोषणेला अजून महिनाही पूर्ण झालेला नसताना, अभयारण्य प्रशासनाने या निर्णयावर केलेला पलटवार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये ही बाब पसरल्याने आता वनखात्याकडून सावरासावर केली जात आहे.
अभयारण्यासाठी आवश्यक जंगल आणि वन्यप्राणी, पक्ष्यांच्या वैविध्यतेमुळे उमरेड-कऱ्हांडला तीन वर्षांपूर्वी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. या अभयारण्यात त्यावेळी दहाहून अधिक वाघ होते. अभयारण्याला अनुकूल अशा सर्वच गोष्टींमुळे पर्यटकांनीही बोर अभयारण्यापेक्षा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला अधिक पसंती दिली. मात्र, प्रशासनाला अभयारण्य सांभाळता आले नाही आणि अभयारण्य व त्यातील वन्यप्राण्यांच्या संवर्धनापेक्षा पर्यटनावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. परिणामी, गेल्या दोन वर्षांत शिकाऱ्यांनीही या अभयारण्याला आपले ‘लक्ष्य’ बनवले आणि आता नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पातून आलेल्या वाघांवर हे अभयारण्य तग धरून आहे. एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी वाघांची संख्या आणि त्यांचे खाद्य असलेले तृणभक्षी प्राणी येथून नामशेष झाले आहेत. सध्या केवळ एकच अपंग असलेला रानगवा पर्यटकांना दर्शन देत आहे. अभयारण्याच्या या दुरावस्थेमुळे पर्यटकांनीसुद्धा इकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे गेलेला पर्यटक परत इकडे कसा वळवायचा आणि उरलेल्या वाघांनी पळवाट काढू नये म्हणून वाघांना खाद्य कसे पुरवायचे, याची नामी युक्ती अभयारण्य प्रशासनाने शोधून काढली आहे.
गाईंना आणि वासरांना अभयारण्याच्या कोअर क्षेत्रात बांधून ठेवण्यासारख्या क्रुर प्रकाराचा अवलंब या अभयारण्यात सुरू झाला आहे. यात आतापर्यंत एका गाईचा बळी गेला असून, आणखी दोन वासरे नवेगाव (साधू) येथील वनविभागाच्या विश्रामगृह परिसरात बांधण्यात आली होती. या घटनेची वाच्यता होताच त्यावर पांघरूण घालण्यात आले. या संपूर्ण प्रकारात एका स्वयंसेवी संस्थेचीही मदत घेण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. चित्रीकरणासाठी या स्वयंसेवी संस्थेने ही शक्कल लढवली. चित्रीकरणासाठी गाईला जंगलाच्या मध्यस्थानी दावणीला बांधण्यात आले. ही गाय नजरेस पडताच वाघांनी तिचा फडशा पाडला. कॅमेरा ट्रॅपमध्ये ३१ मार्चच्या चित्रीकरणात फडशा पाडलेल्या गाईवर नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पातून आलेल्या जय, चांदी व तिच्या चार बछडय़ांनी ताव मारल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. या प्रकरणाची वाच्यता आता सर्वत्र होऊ लागल्याने वनखात्याकडून सारवासारवीचा प्रयत्न होत आहे.

मला काहीच माहिती नाही -सर्जन भगत
अभयारण्यात काय सुरू आहे आणि काय नाही, याबाबत मला काहीच माहिती नाही. जोपर्यंत ही बाब स्पष्ट होत नाही, तोपर्यंत मी यावर काहीच बोलू शकत नाही, असे वक्तव्य राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सर्जन भगत यांनी केले.