शहर स्वच्छतेचे कंत्राट एका खासगी संस्थेला देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी चंद्रपूरच्या माजी नगराध्यक्ष बिता रामटेके व त्यांचे पती अ‍ॅड. घनश्याम रामटेके यांना अनुक्रमे तीन व दोन वर्षांची शिक्षा जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त न्यायाधीश अ.सी. भसारे यांनी ठोठावल्याने राजकीय व विशेषत: काँग्रेसच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
येथील पंचशील वार्डातील शीतला माता महिला सफाई कामगार सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षा कविता राजेश महातव यांच्याकडून ३० जुलै २००४ रोजी दहा हजाराची लाच स्वीकारताना माजी नगराध्यक्ष बिता रामटेके आणि त्यांचे पती अ‍ॅड. घनश्याम रामटेके यांना त्यांच्या घरीच मुद्देमालासह पकडण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तेव्हाचे पोलीस उपअधीक्षक पुरुषोत्तम चौधरी यांच्या नेतृत्वात ही धाडसी कारवाई करण्यात आली होती. तेव्हा राज्यभरात हे लाच प्रकरण गाजले होते. विशेष म्हणजे बिता रामटेके या एका खासगी शिक्षण संस्थेतील नोकरीचा एका रात्रीत राजीनामा देऊन कॉंग्रेस पक्षाकडून प्रथमच लोकांमधून थेट नगराध्यक्ष पदावर निवडून आल्या होत्या. प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने कॉंग्रेस पक्षाची चांगलीच बदनामी झाली होती. मात्र त्यानंतरही अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून २००९ मध्ये कांॅग्रेस पक्षाने बिता रामटेके यांना उमेदवारी दिली. लाच प्रकरण चर्चेत असल्याने भाजपच्या अतिशय नवख्या व चंद्रपूरकरांसाठी नागपूरचे पार्सल असलेल्या नाना शामकुळे यांनी त्यांचा  पराभव केला होता.
दरम्यान, या काळात राज्यात कॉंग्रेस आघाडीची सत्ता होती. बिता रामटेके यांचा नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत लाच प्रकरणाला कॉंग्रेस सरकारने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळे प्रतिबंधक विभागाला जवळपास तीन वष्रे दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी वाट बघावी लागली. शेवटी ४ एप्रिल २००७ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणी फिर्यादी, दोन पंच, आणि तपास अधिकारी अशा चौघांचे साक्षीपुरावे तपासले. यावर २९ मार्च रोजी अंतिम सुनावणी झाली. नगराध्यक्ष पदावर राहिलेल्या व्यक्तीला न्यायालय काय शिक्षा देते याकडे सर्वाचे लक्ष लागले असतानाच आज जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त न्यायाधीश भसारे यांनी बिता रामटेके यांना तीन वष्रे तर त्यांचे पती अ‍ॅड. घनश्याम रामटेके यांना दोन वषांची शिक्षा ठोठावली. न्यायालयाच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात विशेषत: कॉंग्रेसच्या वर्तुळात बरीच खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करतानाच या शिक्षेमुळे राजकीय लोकांना चपराक बसली असल्याची प्रतिक्रिया शीतलामाता महिला सफाई कामगार संस्थेच्या अध्यक्षा कविता महातव यांनी लोकसत्ताजवळ बोलताना व्यक्त केली. ही न्यायालयीन लढाई लढताना सलग दहा वष्रे बराच मानसिक त्रास सहन करावा लागला. मात्र शेवटी सत्याचा विजय झाला, असेही त्या म्हणाल्या.