नगरपरिषदेच्या सभागृहात नागरिकांनी निवडून पाठविलेले नगरसेवक लोकप्रश्नांवर बोलण्यापेक्षा वैयक्तिक टिप्पणी करत असल्याचे आजच्या विशेष सभेचे चित्र सभागृहशास्त्राला सोडून होते. त्यातील एक नगरसेवक कर्मचाऱ्यावर चहा आणि नाष्टा आणण्यासाठी दातओठ चावत असलेले पाहून अधिकाऱ्यांवर कपाळाला हात लावण्याची वेळ आली होती. सभागृहातील हे चित्र पाहिल्यावर नागरिकांच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधी किती गंभीर आहेत हे स्पष्ट होते.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नगरपरिषदेच्या मासिक सभा होऊ शकल्या नाहीत. यातच मुख्य अधिकारी डॉ. सुधाकर जगताप यांना ठेकेदाराकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याने कोणतेही धोरणात्मक निर्णय होऊ शकले नव्हते. यात मंगळवारी नगरपालिकेत विशेष सभा बोलाविण्यात आली होती. या सभेपुढे २४ विषय मंजुरीसाठी ठेवले होते. यामध्ये वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करणे, नगरपालिकेमार्फत बालवाडी सुरू करणे, नगरपालिकेच्या मालकीची कोळेश्वर विद्या मंदिर शाळा बांधकाम करण्यासाठी अंदाजित खर्चाला मंजुरी देणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील परिपत्रकाच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने सादर केलेल्या अहवालावर निर्णय घेणे, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहाकरिता नाटय़क्षेत्रातील जाणकार व्यक्तींची सल्लागार समिती स्थापन करणे आणि प्रशासकीय खर्चास मंजुरी देणे आदी महत्त्वांच्या विषयांचा समावेश होता. मात्र नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा सुरू झालेल्या या बैठकीत नगराध्यक्षांची मुदत संपल्याने त्यांना बैठक बोलाविण्याचा अधिकार नसल्याचे सांगत विरोधी पक्षाने आक्षेप नोंदवला होता. सभा सुरू असताना काही नगरसेवक नगरपरिषद कर्मचाऱ्यांना चहा आणि नाष्टा कोठे आहे म्हणून दटावत होते. चहा आल्यानंतर त्यावर फुरका मारण्यात हे नगरसेवक मग्न होते. त्याच गडबडीत विशेष सभा तहकूब करण्यात आली. यानंतर सभागृहाबाहेर पडलेले काही नगरसेवक प्लेटमधील नाष्टय़ाची चव चाखण्यात व्यस्त झाले होते.