नागपुरातील बहुप्रतीक्षित मेट्रो रेल्वेच्या प्रशासकीय कार्यालय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी पार पडले.
दीक्षाभूमीसमोरील नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर झालेल्या या कार्यक्रमाला खासदार अविनाश पांडे, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे व विकास कुंभारे हे आमदार, महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, माजी अध्यक्ष संदीप जोशी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. हर्षदीप कांबळे, महापालिकेचे आयुक्त श्याम वर्धने, मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि मेट्रोसाठी अविरत प्रयत्न करणारेप्रवीण दराडे, नासुप्रचे विश्वस्त डॉ. छोटू भोयर, माजी आमदार यादवराव देवगडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव टालाटुले यांच्यासह अनेक नागरिक व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी लगेचच भूमिपूजन तसेच कोनशिलेचे अनावरण केले. मुख्यमंत्र्यांनी इमारतीची माहिती जाणून घेतली. नासुप्रचे सभापती डॉ. हर्षदीप कांबळे, अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार, प्रदीप कीडे तसेच इमारत बांधकामाचे कंत्राटदार सुधीर कन्ट्रक्शन्सचे उपाध्यक्ष शरद खंडार, व्यवस्थापकीय संचालक सुशील खंडार, संचालक आनंद शेंडे व धनंजय येरपुडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दीक्षाभूमीसमोरील नागपूर सुधार प्रन्यासच्या ६३५९.८४ चौ.मी. जागेवर ही प्रशासकीय कार्यालयाची सात मजली (तळ व सहामजले) असून सर्वसोयींनी परिपूर्ण आहे. इमारतीच्या चारही बाजूला लँड स्केपिंग, हिरवळ, वृक्ष लावण्याचे प्रस्तावित आहे.
तळघर व तळ मजला ४०५५.४४ चौ.मी. क्षेत्रात पार्किंग असून ११२ कार, २२४ स्कुटर व २२४ सायकल्स ठेवता येतील. इमारतीच्या पहिल्या ते पाचवा मजल्यावर प्रत्येकी ९१२ चौ.मी. क्षेत्रात कार्यालय राहील. सहाव्या मजल्यावर कॉन्फरन्स हॉल व १५० आसन क्षमतेचे ऑडिटोरिअम, असे एकूण १०३० चौ.मी. क्षेत्र राहील. ही इमारत १५ महिन्यात तर संपूर्ण मेट्रो रेल्वे प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण करावयाचा आहे.

भूमिपूजनाचा कार्यक्रम दुपारी ३ वाजता होता. प्रत्यक्षात दुपारी सव्वाचार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वपाच मिनिटांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे आगमन झाले. अवघ्या पाच ते दहा मिनिटात कार्यक्रम आटोपून ते पुढील कार्यक्रमाला रवाना झाले.