उरण शहरातील बाजार पेठेत टिपटॉप या इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील चोरीप्रकरणी  चार जणांना उरण पोलिसांनी अटक केली आहे. ४ मार्च २०१४ मध्ये ही चोरीची घटना घडली होती. या घटनेत १७ लाखांच्या एलईडी टी.व्ही.चोरटयांनी लंपास केले होते.
टिपटॉप दुकानात चोरटय़ांनी दुकानाच्या मागील दारातून शटर तोडून प्रवेश केला होता. हिरकणीच्या साहाय्याने काचा कापण्यात आल्या होत्या. या वेळी दुकानातील एकूण ४० एलईडी टीव्हींची चोरी करण्यात आले.  या मालाची एकूण रक्कम १७ लाख आहे. या चोरीचा तपास उरण पोलीस करीत असताना अशाच प्रकारची चोरी करण्यासाठी रायगड जिल्ह्य़ातील पेण तालुक्यात आलेल्या चोरटय़ांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून हा गुन्हा उघडकीस आल्याची माहिती उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी दिली आहे.
या प्रकरणी मुंबईतील नालासोपारा येथील एका व्यापाऱ्यासह पनवेलमधील तळोजा व नवी मुंबईतील शिरवणे येथे राहणाऱ्या तिघांना उरण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी साडेचार लाखांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांना उरण न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एम. आव्हाड हे करीत आहेत.