जगभरात कुणाशीही मैत्री करण्याचे सर्वाधिक प्रभावी माध्यम म्हणजे फेसबुक. परंतु या फेसबुकच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणे घातक ठरू लागले आहे. यापूर्वी मुलींवर फेसबुक मित्राकडून बलात्कार होत असल्याच्या घटना घडत होत्या. परंतु आता समलिंगी संबंध ठेवणारेसुद्धा फेसबुकच्या माध्यमातून अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळेच पोलीस आणि सायबरतज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिलेला आहे.
सोशल नेटवर्किंग साईटमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुकचा वापर नवीन मित्र जोडण्यासाठी होत असतो. त्या माध्यमातून आपल्या विचारांची, अनुभवांची देवाणघेवाण होते. फेसबुकवर मैत्री जमते, प्रेम जुळतं आणि नंतर लग्नही होतं. परंतु अनेकदा अनोळखी मुलांशी फेसबुकवर मैत्री करणे मुलींना महागात पडत आहे. केवळ प्रोफाईलवर भुलून मैत्री केली जाते. मग या अनोळखी व्यक्तीक डून मोठा त्रास होतो. मुंबईसह देशात अनेक ठिकाणी फेसबुक मित्राकडून बलात्कार होत असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. नुकतेच कांदिवलीत धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. समलैंगिक संबंधाला चटावलेल्या एका ३३ वर्षीय तरुणाने या कामासाठी फेसबुकचा वापर सुरू केला. त्याने मुलीच्या नावाने फेसबुकवर खाते उघडले आणि त्याच्याच परिसरातल्या एका १५ वर्षीय मुलाला फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवली होती. यानंतर त्याने एका मुलीची अनावृत्त छायाचित्रे या मुलाला पाठवून त्याच्याकडेही अशाच छायाचित्रांची मागणी केली. त्याला भुलून त्या मुलाने आपली नग्न छायाचित्रे पाठवली. त्यानंतर या छायाचित्राच्या आधारे या मुलाला ब्लॅकमेल करत सतत तीन महिने समलिंगी संबंध ठेवण्यास भाग पाडले. समता नगर पोलिसांनी या आरोपी तरुणाला अटक केली. अनेक मुलांना त्याने अशा पद्धतीने फेसबुकवर फसवून जाळ्यात ओढले होते, अशी माहिती समोर येत आहे.
फेसबुक वापरण्याचे सर्वाधिक प्रमाण अल्पवयीन मुलांचे असते. त्यांना सायबर धोके आणि होणाऱ्या फसवणुकींबाबत माहिती नसते. त्यामुळे ते अशा सापळ्यात बळी पडतात. परतु अनेकदा सज्ञान मुली आणि महिलासुद्धा त्यात सापडतात. कारण दुसऱ्या शहरातील किंवा राज्यातील व्यक्तीशी मैत्री करताना त्याबाबत माहिती नसते.  गेल्या वर्षी गोव्यातील एका १४ वर्षीय मुलीच्या बाबतीत घडलेली घटना बोलकी ठरावी. या मुलीने सहा महिन्यांपूर्वी मुंबईच्या एका स्मार्ट दिसणाऱ्या तरुणाशी फेसबुक मैत्री केली होती. त्याने आपण बडय़ा व्यापाराचा मुलगा असल्याचे भासवले होते. त्याच्या रूपालाही ती मुलगी भुलली होती. यानंतर ती त्याला भेटायला मुंबईला आली. परंतु प्रत्यक्षात जो मुलाचा फोटो फेसबुकवर होता तो या मुलाचा फोटो नव्हता. तो मानखुर्दच्या एका झोपडपट्टीत राहत होता. त्याने वेळ मारून नेली, पण दोन दिवस मुलीला आपल्या ताब्यात ठेवून तिच्यावर बलात्कार केला आणि या मुलीला मुंबई शहराच्या गर्दीत सोडून फरार झाला. कुर्ला रेल्वे पोलिसांनी मोठय़ा कौशल्याने या मुलाला शोधून काढले. हा मुलगा भंगारविक्रीचा धंदा करणारा होता.
काही घटना
२८ मे २०१५ : अंधेरीच्या एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या एका १३ वर्षीय मुलीला तिच्या जम्मू काश्मीरमध्ये राहणाऱ्या फेसबुक मित्राने भेटायला बोलावले. ती आजीशी भांडण करून त्याला भेटण्यासाठी गेली. परंतु अंधेरीत चार तरुणांनी तिला गाठले. मदतीचा बहाणा करत तिला धारावीत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
१० नोव्हेंबर २०१४ : पुण्यातील एका २४ वर्षीय तरुणीचे फेसबुकवर मुंबईतील एका तरुणाशी प्रेम जुळले. त्या फेसबुक मित्राने तिला मुंबईला भेटायला बोलावले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. निर्मल नगर पोलिसांनी या तरुणाला अटक केली.
८ जानेवारी २०१४ : गोव्यात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलाला तिच्या कुर्ला येथे राहणाऱ्या २१ वर्षीय फेसबुक मित्राने मुंबईत बोलावून बलात्कार केला आणि सोडून दिले. त्याने आपले बनावट फेसबुक खाते उघडले होते.
मे २०१३ : घाटकोपर येथे राहणारी एक २० वर्षीय तरुणी भाईंदर येथे राहणाऱ्या एका तरुणाच्या प्रेमात पडली. त्याने तिला घरी भेटायला बोलावले आणि एकांताचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याला पंतनगर पोलिसांनी अटक केली
जानेवारी २०१० : चेंबूर येथील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाने त्याच महाविद्यालयातील तरुणीशी फेसबुकवर मैत्री केली. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला.

काय काळजी घ्यावी?
* अनोळखी व्यक्तींची फ्रेडशिप रिक्वेस्ट स्वीकारू नका. म्युच्युअल (कॉमन मित्र) असले तरी त्याची खात्री करून घ्यावी.
* ज्या व्यक्तीने आपले स्वत:चे छायाचित्र लावले असेल त्यांच्याशीच मैत्री करा. त्याच्या प्रोफाईलवर जाऊन त्याच्या इतर छायाचित्रांशी ती पडताळून पाहा.
* फेसबुकवर कुणालाही आपला मोबाइल आणि इतर वैयक्तिक क्रमांक देऊ नका.
* फेसबुक मित्राला भेटताना जाण्यापूर्वी सुरुवातीला कधीही एकटय़ाने जाऊ नका.
* आपले खाजगी छायाचित्र, कौटुंबिक छायाचित्र शेअर करताना प्रायव्हसी बाळगा. ते पब्लिक (सार्वजनिक) दिसणार नाही याची काळजी घ्या.
* मुंबईच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर गुन्ह्य़ांचा कक्ष स्थापन करण्यात आला असून तेथे जाऊन या संबंधातील कुठलीही तक्रार करता येऊ शकते. आपल्या छायाचित्राचा गैरवापर केला, अश्लिल मेसेजेस पाठवले किंवा कुणी कमेंट करून त्रास देत असेल तर त्याची तक्रार (ज्याला सायबर स्टॉकिंग म्हणतात) सायबर सेलमध्ये जाऊन करता येते.