जून आणि जुलै महिना हा महाविद्यालयीन प्रवेशाचा महिना. दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांची प्रवेशासाठी लगबग सुरू होते. मात्र याच काळात त्यांची गरज लक्षात घेऊन त्यांना प्रवेश मिळवून देतो असे सांगून त्यांना गंडविणारे ठकसेनही सक्रिय होत असतात. नुकत्याच अशा दोन ठकसेनांना विद्यार्थ्यांकडून पैसे उकळताना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभाग आणि गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अटक केली आहे.

प्रवेशाच्या नावावर ६ लाखांना ठकवले
आसाममध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्यांला मुंबईच्या के. जे. सोमय्या महाविद्यालयात पीजीडीएम या अभ्यासक्रमासाठी प्रवेश हवा होता. या महाविद्यालयात मॅनेजमेंट कोटय़ातून प्रवेश मिळवून देतो, असे आश्वासन रोशन सिंग नावाच्या इसमाने या विद्यार्थ्यांला दिले. ५ जूनला त्याने फिर्यादीला वांद्रे येथील नॅशनल कॉलेजसमोर भेटायला बोलावून २ लाख रुपये घेतले. त्यांनतर ९ जूनला विद्याविहार येथे बोलावून ४ लाख रुपये घेऊन लवकरच प्रवेश मिळेल, असे आश्वासन दिले. त्यानंतर मात्र रोशन सिंग मोबाइल बंद करून फरार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप बने यांनी या प्रकरणाचा तपास करून रोशन सिंगबद्दल माहिती काढली आणि त्याला नवी मुंबईच्या सीवूड येथून अटक केली. त्याने रोशन सिंग या बनावट नावाने स्वत:ची ओळख निर्माण केली होती. महाविद्यालय परिसरात विद्यार्थी आणि पालकांना गाठून महाविद्यालयात ओळख असल्याचे भासवून तो त्यांना गंडवत असायचा. त्याने अन्य कुणाला फसवले आहे का त्याचा पोलीस तपास करत आहेत.

उत्तीर्ण करण्यासाठी ७५ हजार
ज्याप्रमाणे महाविद्यालय परिसरात प्रवेशासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना हेरून त्यांना गंडविणारे सक्रिय आहेत तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून देण्याचे आमिष दाखवून त्यांना फसवणारेही सक्रिय आहेत. मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने मंगळवारी विद्यापीठाबाहेर पानाची टपरी चालविणाऱ्या अरुण सालियन (४०) या व्यक्तीला अटक केली. फिर्यादीची मुलगी २०१४ मध्ये तृतीय वर्ष कला शाखेत अनुत्तीर्ण झाली होती. तिने पुनर्पडताळणीसाठी अर्ज केला होता. त्याने या मुलीच्या पालकांना संपर्क करून मुलीला पास करून देतो असे आश्वासन दिले. ही मुलगी पुनर्परीक्षेचा निकाल लागल्यावर पास झाली. तेव्हा अरुणने तिच्या पालकाकडून ७५ हजार रुपये मागितले. तडजोडीनंतर ही रक्कम ६५ हजार ठरली. त्यांनी सुरुवातीला १५ हजार रुपये दिले. स्वत:च्या गुणवत्तेवर उत्तीर्ण झाल्याचा मुलीचा दावा होता. तसेच सालियनच्या कार्यपद्धतीवर शंका होती म्हणून त्यांनी उर्वरित रक्कम दिली नाही. परंतु अरुणचा पैशांसाठी तगादा सुरू होता. अखेर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार केल्यांनतर मंगळवारी त्याला सापळा लावून १० हजार रुपये स्वीकारताना अटक करण्यात आली.
मागील वर्षी माटुंग्याच्या खालसा महाविद्यालयाच्या प्राचार्यानाच लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यामुळे जर कुणी मध्यस्थी, एजंट, महाविद्यालयाचा कर्मचारी प्रवेशासाठी किंवा इतर कामांसाठी लाच मागत असेल तर आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने केले आहे.