‘बँकेतून बोलतो. तुमच्या डेबिट कार्डाचे नूतनीकरण करायचे आहे. त्याचा पासवर्ड, सीव्ही क्रमांक द्या’ असे ग्राहकांना भ्रमणध्वनीवरून सांगून त्यांच्या बँक खात्यातून पैसे लाटण्याचा प्रकार टिटवाळा, कल्याण भागात वाढला आहे. टिटवाळ्यात एका अपंग दाम्पत्याची या भुरटय़ाने फसवणूक केली आहे. या फसवणुकीचे सर्वत्र गुन्हे नोंदून घेतले जात असताना टिटवाळा पोलीस मात्र या दाम्पत्याचा गुन्हा दाखल करून घेण्यास नकार देत आहेत.
टिटवाळ्यातील सांगोडा रस्त्यावरील आंबवणे चाळीत अंबू कृष्णा साळुंखे या पतीसोबत राहतात. हे दाम्पत्य अपंग आहे. पतीचा कल्याणमधील कोळसेवाडीत पानटपरीचा व्यवसाय आहे. साळुंखे दाम्पत्याला गेल्या महिन्यात ९१९९५६८८७३ या भ्रमणध्वनीवरून फोन आला. फोन करणाऱ्याने ‘‘मी बँक ऑफ बडोदा शाखेतून व्यवस्थापक बोलतोय. तुमच्या डेबिट कार्डचे नूतनीकरण करायचे आहे. तुमच्या कार्डचा पासवर्ड, सी. व्ही. क्रमांक द्या’’ असे सांगितले. बँकेच्या फोन बँकिंग सुविधेतून हा फोन आला असावा म्हणून साळुंखेंनी सर्व प्रकारची माहिती दिली. पासवर्ड दिल्याच्या दिवशीच साळुंखेच्या बँक खात्यामधून संध्याकाळी १६ हजार रुपयांची खरेदी व अकराशे रुपयांचे रिचार्ज केल्याचे या दाम्पत्याला समजले. त्यांनी दुसऱ्या दिवशीच बडोदा बँकेच्या टिटवाळा शाळेत धाव घेतली. तेथील व्यवस्थापकाने ‘अशा प्रकारचे पाच प्रकार यापूर्वी घडले आहेत. तुम्ही पोलीस ठाण्यात तक्रार करा. आम्ही काही करू शकत नाही’ अशी असमर्थता दाखवली, असे साळुंखे दाम्पत्याने सांगितले. टिटवाळा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी हा सायबर क्राइम आहे म्हणून तक्रार दाखल करून घेतली नाही. तुम्ही ठाण्याच्या सायबर क्राइममध्ये तक्रार करा असा फक्त सल्ला दिला. भ्रमणध्वनी करणारी व्यक्ती आताही फोन उचलते. तिला अटक करा, या मागणीकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला याबाबत लेखी तक्रार केली आहे. तेथील कर्मचारी याबाबत बँकांना पत्र पाठवले आहे. बघतो, करतो अशी उत्तरे साळुंखे यांना देत आहेत. दररोज रुपयाच्या हिशेबात जमा केलेली पुंजी भुरटय़ाने लाटल्याने साळुंखे दाम्पत्य हवालदिल आहे. भोंडिवले या गृहस्थांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाली आहे.