‘म्हाडा’च्या कोटय़ातील घरे उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून आणि त्याबाबतची खोटी कागदपत्रे देऊन काही नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी एकूण २८ जणांनी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून ही फसवणूक एकूण ३ कोटी ३७ लाख १९ हजार १५० रुपयांची आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांनी मंगळवारी मुंबईत आझाद मैदानात धरणे आंदोलन केले.
मालवणी, मालाड (पश्चिम) येथे आमिर इम्रान अ‍ॅकॅडमी येथे आपण गेलो असता तेथील इम्रान खान, सर्फराज रिझवी, आमिर खान, कामरान खान यांनी मालाड पश्चिम येथील ‘म्हाडा’च्या योजनेतील सदनिका नावावर करून देऊ असे सांगितले. या सदनिकेची किंमत २० लाख रुपये असल्याची माहिती देऊन ही रक्कम तातडीने भरावी, असे सांगून अन्य काही व्यक्तींनी ‘म्हाडा’च्या घरांसाठी त्यांच्याकडे जमा केलेल्या पैशांच्या रकमेची कागदपत्रे दाखविली. त्यावर विश्वास ठेवून आपण विविध बँकेतील खात्यांमधून काही रकमेचेधनादेश दिले.
जुलै २०१२ मध्ये वाढीव चटईक्षेत्र निर्देशांनुसार ८७ हजार रुपये भरावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार आपण ही रक्कम घेऊन ‘म्हाडा’ कार्यालयात गेलो तेथे हे चौघेजण एका गाडीत बसलेले होते. गाडीत बसलेल्या एका व्यक्तीची ‘म्हाडा’चे अधिकारी म्हणून ओळख करून देऊन आपण ही रक्कम त्यांच्याकडे दिली. त्यानंतर आपल्याला ‘म्हाडा’चे चिन्ह व शिक्का असलेली पावती, मुद्रांक शुल्क भरलेले आणि राजमुद्रा असलेले अ‍ॅलोटमेंटचे पत्र मिळाले. डिसेंबर २०१२ पर्यंत सदनिकेचा ताबा मिळेल, असे आपल्याला सांगण्यात आले होते. पण अद्याप आपल्याला सदनिकेचा ताबा मिळालेला नाही, असे कृष्णा मुळीक यांनी तक्रारीत म्हटले आहे.