वडनेर दुमाला शिवारात ३३ लाखांत बंगला विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात देऊन बनावट दस्तावेजाच्या आधारे तीन संशयितांनी अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. संबंधित ग्राहक जाब विचारण्यास गेले असता त्यांना दमदाटी करण्यात आली. बंगल्यासाठी सात ग्राहकांची संशयितांनी एक कोटी ५३ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर व आसपासच्या भागातील जमिनींना सोन्याचा भाव प्राप्त झाल्यानंतर मालमत्ता क्षेत्रात फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत. बनावट दस्तावेजांच्या आधारे मूळ मालकाला अंधारात ठेवून परस्पर जमीन वा भूखंड विक्री झाल्याप्रकरणी याआधी गुन्हे दाखल झाले आहेत. या नव्या घटनेने त्यात भर पडली आहे. या प्रकरणी ठाणे येथील सूरज सुरेश पै यांच्यासह अन्य सहा जणांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून प्रकाश लक्ष्मण सूर्यवंशी (शिरीन मडोज, गंगापूर रोड), प्रमोद इंगळे, उमेश शांताराम विठोरे व उमेश जाधव (मधुरा अपार्टमेंट, कॉलेज रोड) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ नोव्हेंबर २०१३ ते २८ ऑक्टोबर २०१४ या कालावधीत हा प्रकार घडला. संशयितांनी काही स्थानिक दैनिकांमध्ये दुमाला शिवारात जकात नाका क्रमांक चारच्या मागील बाजूस वडनेर येथे ३३ लाख रुपयांत आमच्याकडे बंगले विक्रीसाठी असल्याची जाहिरात दिली होती. ही जाहिरात पाहून अनेक ग्राहकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. संशयितांनी सुरेश पै यांच्याकडून बंगल्यासाठी २२ लाख रुपये, समीर घोडके यांच्याकडून १२ लाख २० हजार, दर्शना दप्तरी यांच्याकडून २६ लाख रुपये, संगीता पोहेकर २८ लाख ९५ हजार, योगेश पाटील २१ लाख ७५ हजार, जस्मिन जगदीश सोनी १८ लाख, योगेशकुमार गुप्ता यांच्याकडून २४ लाख ११ हजार रुपये स्वीकारल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
संशयितांनी वेळोवेळी रोख वा धनादेशाच्या स्वरूपात ही रक्कम स्वीकारली. त्याची नोंदणी करूनही बंगले न देता बनावट कागदपत्र तयार केले. ही बनावट कागदपत्र खरी आहेत असे भासवून दुसऱ्या ग्राहकांना बंगले दाखवून त्यांच्याकडूनही मोठय़ा प्रमाणात रक्कम स्वीकारण्यात आल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. फसवणूक झालेले ग्राहक संबंधितांकडे जाब विचारण्यास गेले असता त्यांनी दमदाटी केल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित सूर्यवंशी, इंगळे, विठोरे, जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण घटनाक्रम चक्रावून टाकणारा आहे. शहरालगतच्या भागात अल्प किमतीत बंगला देण्याचे आमिष दाखवत संबंधितांनी काही ग्राहकांकडून पैसे स्वीकारले. नंतर या ग्राहकांना ते बंगले न देता पुन्हा इतरांना ते विक्रीसाठी असल्याचे दाखविले. पोलीस यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी सात जणांकडून बंगल्यापोटी एकूण दीड कोटींहून अधिक रक्कम स्वीकारल्याचे सांगितले.
शहर व परिसरातील जमिनींचे भाव गगनाला भिडल्यानंतर या क्षेत्रात वेगवेगळ्या प्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. बाहेरगावी वास्तव्यास असणाऱ्या भूखंडधारकाचे भूखंड त्यांच्या अपरोक्ष परस्पर विक्री करणे, मालमत्ता व्यवहारात दबाव तंत्राचा अवलंब करणे, बनावट दस्तावेजाच्या आधारे जागा वा भूखंडाची विक्री करणे असे अनेक प्रकार गेल्या काही वर्षांत उघडकीस आले आहेत. त्यावरून गुन्हेही दाखल झाले. मालमत्तेच्या व्यवहारात चाललेल्या साठमारीमुळे सर्वसामान्य ग्राहकांचा जीव टांगणीला लागत आहे. या व्यवहारांची फारशी माहिती नसल्याने काही बिल्डर, दलाल किंवा या क्षेत्रातील काही संधिसाधूंकडून दाखविल्या जाणाऱ्या आमिषाला सर्वसामान्य ग्राहक सहजपणे बळी पडतो. त्यांना या व्यवहारातील खाचाखोचा माहीत नसल्याचा लाभ संधिसाधू उचलतात. या व्यवहारात नाडले गेल्यास सर्वसामान्य नागरिक आयुष्यभराची पुंजी गमावून बसतात. या प्रकारांवर र्निबध आणण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.