निसर्गाचा समतोल राखणाऱ्या वन्यजीवांचे विशेषत: सापांचे संरक्षण करण्यासाठी गावोगावी नोंदणीकृत, अनोंदणीकृत सर्पमित्र संघटना व गट निर्माण झाले आहेत. काही संस्थेचे सदस्य विषारी सापांसोबत जीवघेणे स्टंट करीत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अशा प्रकारांमुळे गेल्या आठवडय़ात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागण्याची घटना येथे घडली असून अशा प्रकारचे नवगारुडीचे खेळ थांबविण्याची मागणी सर्पमित्रांनी केली आहे.
विकासाच्या नावाखाली जंगले व शेती झपाटय़ाने नष्ट होत चालली आहेत. वन्यजीव सापांनी शहर, नागरी वस्ती तसेच गावांचा आधार घेतला आहे. या सापांना पकडण्यासाठी सर्पमित्र संघटनाही स्थापन झाल्या आहेत. हे सर्पमित्र या सापांना जंगलात त्याच्या नैसर्गिक ठिकाणी सोडण्याचे काम करीत असतात.
साप पकडणे हे तसे धोक्याचे असते, कारण साप पकडताना तो विषारी आहे की बिनविषारी याची माहिती अनेकांना नसते. मात्र विषारी सापाप्रमाणेच बिनविषारी सापही दंश करीत असतात. सापांना हाताळताना घ्यावयाच्या खबरदाऱ्या अनेकदा माहीत नसतानाही काही तरुण हौस व निडरपणा दाखविणारे स्वयंघोषित सर्पमित्र साप पकडण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. त्यामुळे सर्पदंशाच्या घटनांतही वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी अशा हौसी सर्पमित्रांकडून गावातील नागरिकांसमोर प्रदर्शन म्हणून सापाचा मागच्या व पुढच्या बाजूने मुका घेणे, त्याला फणा काढण्यास भाग पाडणे, साप उभा करून दाखविणे आदी खेळ केले जातात. अशा वेळी त्रस्त झालेले विषारी साप दंश करतात. अशाच एका प्रकारामध्ये गेल्या आठवडय़ात दिघोडे गावात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. अशा प्रकारे वन्यजीवाशी सुरू असलेले खेळ थांबविण्यासाठी वन विभागाने अधिकृत व प्रशिक्षण घेतलेले सर्पमित्र जाहीर करावेत, अशी मागणी उरणमधील सर्पमित्र रघुनाथ नागवेकर यांनी केली आहे.
जगदीश तांडेल, उरण