इमारतीभोवती आणि जिन्यांतील मोकळ्या जागेत गटागटाने प्रत्येकाची एकच चर्चा सुरू आहे.. काही निवडक पदाधिकाऱ्यांची काचबंद दालनात चाललेली खलबते.. चौथ्या मजल्यावरील सभागृहात जमलेल्या अपंग संघटनांच्या शिष्टमंडळाची भेट घेण्यास खुद्द ‘साहेब’ येणार असल्याने काही जण त्या तयारीत गुंतलेले.. काहींची भ्रमणध्वनीवरून प्रचार फेरी, बैठक आदींचा आढावा घेण्याची धावपळ चाललेली.. प्रचाराहून आलेले आणि निघालेल्या कार्यकर्त्यांची इमारतीच्या गच्चीवरील मंडपात श्रमपरिहारासाठी झालेली गर्दी.. त्यातील काही जण समोरील उड्डाण पुलाची छबी टिपण्यात दंग.. शहर व जिल्हा कार्यालयातील खुच्र्यावर कोणाकोणाची प्रतीक्षा करणारे कार्यकर्ते..
शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलाला खेटून असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर व जिल्हा कार्यालयात अर्थात राष्ट्रवादी भवनमध्ये सोमवारी दिसलेले हे चित्र. नाशिक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ आणि दिंडोरीच्या डॉ. भारती पवार यांच्या प्रचाराची धुरा या अत्याधुनिक व आलिशान कार्यालयाकडून पेलली जात आहे. नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबविणे म्हणजे नेमके काय ते या कार्यालयातील एकंदर घडामोडींचा वेध घेतल्यावर लक्षात येते. कार्यालयासमोरील सव्‍‌र्हिस रोडवर एकापाठोपाठ एक चारचाकी वाहने येत असतात, तसेच वेगवेगळी जबाबदारी सोपविलेले महिला व पुरुष कार्यकर्ते मोटारीतून बाहेरही निघालेले असतात. कार्यकर्त्यांची ही लगबग सुरू असली तरी भवनमधील गर्दी मात्र कायम. पहिल्या मजल्यावरील सभागृहात सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम झाला. यावेळी नगरसेवक सचिन महाजन व गोकुळ पिंगळे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष पद्माकर पाटील आदी उपस्थित होते. त्यानंतर लगेच पदाधिकारी पुन्हा कामाला लागले. मग, काही जणांचे एका काचबंद कक्षात मंथनही झाले.
भुजबळ यांचे अतिशय निकटवर्तीय तीन ते चार पदाधिकारी प्रचाराचा दैनंदिन कार्यक्रम आधीच निश्चित करतात. प्रत्येक कामाची जबाबदारी पुढे त्या त्या भागातील प्रमुख पदाधिकाऱ्यावर सोपविली जाते. या सर्व कार्यक्रमांची माहिती लघुसंदेश अन् दूरध्वनीद्वारे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविली जाते. सोमवारी भुजबळ यांच्या कार्यक्रमपत्रिकेत सकाळ ते सायंकाळ अशा दोन सत्रात एकूण १३ कार्यक्रमांची आखणी करण्यात आली होती. टळटळीत उन्हात प्रचार करताना होणारी दमछाक लक्षात घेऊन दुपारी दीड ते चार वाजेपर्यंतचा कालावधी विश्रांतीसाठी राखीव ठेवल्याचे पत्रिकेवरून लक्षात येते. त्यात दुपारी साडे बाराची वेळ अपंग संघटनांच्या शिष्टमंडळाची भेट घेण्यासाठी निश्चित झालेली. १०० ते १५० जणांचे हे शिष्टमंडळ आधीच भवनमध्ये दाखल झाले. कार्यालयात येणारी वेगवेगळी शिष्टमंडळे वा प्रचारास जाणाऱ्या व येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भोजनासाठी इमारतीच्या गच्चीवर मंडप उभारून खास व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या दिवसभर तेथील भटारखाना सुरू असतो असे कार्यकर्ते सांगतात. भोजनाचा आस्वाद घेताना काही उत्साही मंडळी समोरील उड्डाण पुलाची छायाचित्रे भ्रमणध्वनीत टिपत असतात.
कार्यालयात प्रत्येकाची वेगवेगळी लगबग दिसते. कोणी मतदार याद्यांची विचारणा करतो तर कोणी दूरध्वनीवरून वाहने पोहोचली की नाही, याची माहिती घेतो. नगरसेवक गोकुळ पिंगळे व विक्रांत मते, दिलीप खैरे, काँग्रेसचे लक्ष्मण मंडाले हे चार ते पाच पदाधिकाऱ्यांसमवेत या ठिकाणी दाखल होतात. त्यातील काही जण काँग्रेस कमिटीत निघण्याच्या तयारीत असतात.
दुसरीकडे प्रमुख पदाधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनीवरून प्रचार नियोजनासंबंधी वेगवेगळ्या सूचनांचे अव्याहत गुऱ्हाळ सुरू असते. खा. समीर भुजबळही सध्या दररोज कार्यालयात हजेरी लावतात. नव्याने वा प्रथमच आलेल्या कार्यकर्त्यांना शहर वा जिल्हा राष्ट्रवादीचे कार्यालय नेमक्या कोणत्या मजल्यावर आहे, याची कल्पना नसते. त्यामुळे ग्रामीणचे काही कार्यकर्ते अनवधानाने शहराच्या कार्यालयात शिरतात. बहुमजली इमारतीत कोणाची दमछाक होणार नाही, याची धुरा दोन ‘लिफ्ट’ वाहत असतात. या व्यतिरिक्त प्रत्येक मजल्यावर मदतनीसवजा सुरक्षारक्षक तैनात आहेत. प्रचारादरम्यान काँग्रेसशी समन्वय साधण्यासाठी जसा आपला प्रतिनिधी राष्ट्रवादीने काँग्रेसच्या कार्यालयात नियुक्त केला, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या कार्यालयातून समन्वय साधण्यासाठी काँग्रेसचे उल्हास सातभाई यांना नियुक्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.