नवी मुंबईतील प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पुनर्बाधणीसाठी लागणारा वाढीव चटई निर्देशांकाचा (एफएसआय) प्रश्न पुन्हा पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ऐरणीवर आला असून यासाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे आग्रही झालेल्या आहेत. ही भूमिका यापूर्वी माजी पालकमंत्री गणेश नाईक पार पाडत होते. वाढीव एफएसआयचा लोकसभा, विधानसभा निवडणुकीत नाईक गटाला वाशीमध्ये मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी म्हात्रे यांनी कंबर कसली आहे.
नवी मुंबईतील एफएसआयचा प्रश्न गेली वीस वर्षे भिजत पडला आहे. वाशी सेक्टर ९, १० मधील इमारतींची स्थिती जर्जर झाली असून त्यांच्या पुनर्बाधणीचा प्रश्न लवकरात लवकर निकाली निघण्याची आवश्यकता आहे. शहरात अशा ८१ इमारती असून सव्वा लाख रहिवाशी त्यात राहत आहेत. त्यामुळे पालिकेने अडीच एफएसआयचा प्रस्ताव सरकारकडे अडीच वर्षांपूर्वी दिला आहे. नाईक यांनी हा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी शेवटच्या टप्प्यात जोरदार प्रयत्न केले, पण ते अयशस्वी ठरले. त्यामुळे वाशीत नाईक यांना काही प्रमाणात फटका बसला. एफएसआयच्या या प्रश्नावर सर्व प्रमुख पक्षाचे राजकारण फिरत असून भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांना त्याची जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर अनेक वेळा चर्चा केली. पालिका निवडणुकीअगोदर या प्रश्नाची तड लावण्यात यावी यासाठी साकडेदेखील घातले आहे.
यापूर्वी त्या सिडकोने प्रस्तावित केलेल्या तीन एफएसआयची री ओढत होत्या, पण आता त्यांनी अडीच एफएसआय पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
त्यासाठी पालिका आयुक्त दिनेश वाघमारे आणि सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्याशी त्यांनी नुकतीच चर्चा केली असून आघाडी सरकारने मंजूर केलेल्या एफएसआयच्या अध्यादेशामध्ये काही बदल करावे लागतील अशी सूचना मांडल्याचे समजते. पुढील आठवडय़ात या विषयावर मुख्यमंत्र्याकडे पालिका व सिडको सादरीकरण करणार आहे.

नवी मुंबईतील मोडकळीस राहणाऱ्या इमारतीतील रहिवाशांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळेच मी सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करीत असून यापूर्वीच्या पालिका प्रस्तावात काही बदल करण्याची आवश्यकता आहे. त्या संदर्भात दोन्ही सनदी अधिकाऱ्यांबरोबर नुकतीच चर्चा केली असून येत्या काळात हा प्रश्न निकालात काढण्याचा मी प्रयत्न करीत आहे.
-मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर