दर दिवशी १४ लाख लिटरहून जास्त डिझेल पिणाऱ्या एसटीला डिझेल दरवाढीचा फटका दर दोन महिन्यांनी बसत असतो. आधीच तोटय़ात असलेल्या एस.टी.ला हा फटका कमीत कमी बसावा, यासाठी महामंडळानेच एक नामी शक्कल लढवली आहे. एसटीने आपल्या प्रत्येक आगारात आणि विभागीय कार्यशाळांत एक स्टिम्युलेटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या स्टिम्युलेटरच्या माध्यमातून गाडी चालताना इंधन कसे आणि किती खर्च होते, हे कळू शकणार आहे.
‘डिझेलचा प्रत्येक थेंब मोलाचा’ हा संदेश चालकांच्या मनावर ठसवण्यासाठी एस.टी. नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असते. याच उपक्रमाचा भाग म्हणून एस.टी.च्या बुलढाणा आणि नागपूर कार्यशाळेतील तंत्रज्ञांनी भंगार सामानातून उपयुक्त स्टिम्युलेटर तयार केले आहेत. हे स्टिम्युलेटर तयार करण्यासाठी पाच ते सहा हजार रुपयेच खर्च आला आहे. हे स्टिम्युलेटर एसटीच्या २४८ आगारांत आणि ३० विभागीय कार्यशाळांमध्ये लावण्यात येणार आहेत.
एस.टी. चालवताना डिझेलचा वापर नेमका कसा होतो, हे या यंत्रामार्फत चालकांना स्पष्ट करून दाखवले जाते. म्हणजे बसचा वेग हळूहळू वाढवल्यावर डिझेलच्या वापरात फरक पडत असल्याचे यंत्राद्वारे स्पष्ट दिसते. तसेच ताशी ६५ किलोमीटर या वेगापुढे अ‍ॅक्सलेटर दाबून ठेवल्यास इंधन जास्त वापरले जाते, हेदेखील चालकांना दाखवून देण्यात येणार आहे.
चालकांच्या आठ तासांच्या कामगिरीत बस योग्य वेगात चालवल्यास आणि अ‍ॅक्सलेटरचा योग्य वापर केल्यास दर दिवशी पाच लीटर डिझेलची बचत होऊ शकते, हे चालकांच्या मनावर बिंबवले जाणार आहे.इंधनाच्या वाढत्या दराच्या संकटातून एस.टी.ची सुटका होणे शक्य नाही. मग एस.टी.ला या संकटाशी सामना करावा लागणार आहे. त्यासाठी मग इंधन बचतीचा मार्ग सोयीस्कर आहे. म्हणूनच आम्ही या स्टिम्युलेटरच्या माध्यमातून चालकांना इंधन बचतीचे धडे देणार आहोत, असे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.